आॅनलाइन लोकमतधुळे : माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या दिवाळीच्या सुटीत बदल करण्यात आलेला आहे. या विभागाचे द्वितीय सत्र आता १३ नोव्हेंबर १९ पासून सुरू होणार असल्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.गेल्या एप्रिल महिन्यात माध्यमिक विभागाच्या २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील सुट्यांचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार दिवाळीची सुटी २१ आॅक्टोबर ते ९ नोव्हेंबर १९ अशी १८ दिवसाची नियोजीत करून द्वितीय सत्राला ११ नोव्हेंबरपासून सुरूवात होणार होती.मात्र सप्टेंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यात २१ आॅक्टोबर रोजी मतदान ठेवण्यात आले. शिक्षकांच्या सुटीचा पहिलाच दिवस मतदानाच्या कामात जाणार असल्याने, सुटीच्या कालावधीत बदल करण्यात यावा, अशी मागणी शिक्षक, मुख्याध्यापक संघटनांनी केली होती. त्याची दखल शिक्षण विभागाने घेतली आहे.आता माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाला दिवाळीची सुटी २२ आॅक्टोबर ते ११ नोव्हेंबर अशी असेल. १२ रोजी गुरूनानक यांच्या जयंतीची सुटी आहे. त्यामुळे माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या शाळा १३ नोव्हेंबर २०१९पासून नियमित सुरू होतील, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
धुळ्यात ‘माध्यमिक’चे द्वितीय सत्र १३ नोव्हेंबरपासून सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 11:29 AM