धुळे : बियाणे, खते, कीटकनाशके आदी कृषी निविष्ठांचा काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी कृषी विभागाने नियंत्रण कक्षाची स्थापना केली असून, पाच तंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती या कक्षात केली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी दिली.
खरीप हंगाम २०२१ मध्ये बियाणे, खते व कीटकनाशकांबाबत शेतकरी, कंपनी प्रतिनिधी व विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर वेगवेगळ्या अडचणी आल्याचे निदर्शनास आले आहे. खरीप हंगामामध्ये बियाणे पेरणीचा कालावधी अत्यंत अल्प असल्याने अडचणी व तक्रारींचे वेळेत निराकरण होणे गरजेचे आहे.
कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे वाहतूक, वितरण व विक्री करताना अडचणी निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत कृषी निविष्ठांचा काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी, त्यांचे उत्पादन, वितरण व विक्री नियंत्रित करणे आवश्यक आहे. गुणवत्ता व पुरवठ्याच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. या कक्षात दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क साधता येणार आहे. संपर्क साधण्यासाठी कृषी विभागाने फोन नंबर व अधिकाऱ्यांचे मोबाइल क्रमांकदेखील जारी केले आहेत.
नियंत्रण कक्षात नेमलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केली तर त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सेवा व शर्तीच्या नियमानुसार कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी दिला आहे.