लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडीनंतर आता मंगळवारी जिल्हा परिषदेच्या विविध विषय समिती सभापतींची निवड होणार आहे. यात कोणाकोणाची वर्णी लागते याकडे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान विषय समिती सभापतींची निवड बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे.धुळे जिल्हा परिषदेची एकूण सदस्य संख्या ५६ आहे. तीन आठवड्यांपूवी झालेल्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक म्हणजे ३९ जागा जिंकून प्रथमच जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता मिळविली आहे.निवडणुकीनंतर अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड झाली. अध्यक्षपद सर्वसाधारण असल्याने, या पदासाठीही बरीच चुरस होती. मात्र यावेळी प्रथमच भाजपने शिरपूर तालुक्यातील सर्वच्या सर्व म्हणजे १४ जागांवर विजय मिळविल्याने, अध्यक्षपदी शिरपूर तालुक्यातील विखरण गटातून निवडून आलेले डॉ. तुषार रंधे यांची निवड झालेली आहे.दरम्यान अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड झाल्यानंतर आता विषय समिती सभापतीच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.सभापतीपदावर आपली वर्णी लागावी यासाठी काहींचे अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत.अर्थ व बाधकाम समितीचे सभापतीपद हे उपाध्यक्षांकडे असेल. त्यामुळे उर्वरित चार सभापतीपदासाठी चुरस निर्माण झालेली आहे. यात प्रत्येक तालुक्याला सभापतीपदाची संधी देवून समतोल साधण्याचा पक्षश्रेष्ठींचा विचार सुरू आहे. यात कोणत्या तालुक्याला कोणते सभापतीपद मिळते याची उत्सुकता आहे. सभापतींची निवड बिनविरोध करण्याचा प्रयत्न आहे. यात कितपत यश येते हे निवडीनंतर स्पष्ट होवू शकणार आहे.दरम्यान, सभापती निवडणुकीच्या दरम्यान जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची गर्दी होणार असल्याने जिल्हा परिषदेच्या आवारात बॅरिकेटस् लावले आहेत.
विषय सभापतींची आज होणार निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 12:08 PM