धुळे : जळगाव रोडवरील फागणे ते मुकटी दरम्यान एका हॉटेलजवळ महिला आपत्तीजनक अवस्थेत आढळून आली होती़ तिला तातडीने पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे़ तपासणीअंती ती मनोरुग्ण असून तिच्यावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार झालेला नाही़ तिची ओळख पटविण्याचे काम सुरु असल्याची माहिती तालुका पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ फागणे ते मुकटी दरम्यान हॉटेल माँ करणीजवळ शुक्रवारी सकाळी आठ वाजेपुर्वी एक महिला बेशुध्दावस्थेत पडलेली आढळून आली होती़ तिच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा होत्या़ शिवाय तिच्या अंगावर साधे कपडेही नव्हते़ तिच्या अंगावर जखमा असल्याने तिला कोणीतरी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने येथे आणून टाकले असावे असा संशय बळावला होता़ तसेच ती ज्या अवस्थेत हॉटेलजवळ आढळून आली ती अवस्था पाहता तिच्यावर अत्याचार ेझाल्याचीही शक्यता वर्तविण्यात येत होती़ या घटनेची माहिती तालुका पोलिसांना तात्काळ कळविण्यात आली़ घटनेचे गांभिर्य ओळखून पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, तालुका पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्यासह श्वान पथक, फॉरेन्सिक लॅबचे वाहन घटनास्थळी दाखल झाले होते़ यानंतर पोलिसांनी त्या महिलेला वैद्यकीय उपचारासाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले आहे़ तिची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु आहे़ ती थोडी शुध्दीत आल्यानंतर पोलिसांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला़ मात्र, ती वेगवेगळ्या गावांची नावे सांगत असल्याने तिची ओळख पटविणे अशक्य ठरत आहे़ ती मनोरुग्ण असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे़ तसेच पोलिसांच्या तपासात ती महिला ज्या ज्या गावांचा उल्लेख करीत आहे, जी माहिती देत आहे त्या दृष्टीने पोलिसांनी आपला तपास सुरु केला असल्याचे सांगण्यात आले़
‘ती’ महिला मनोरुग्ण, तिच्यावर अत्याचार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 10:20 PM