शिंदखेडा (जि. धुळे) : शिंदखेडा रेल्वे स्टेशनवर शनिवारी सकाळपासून नवजीवन एक्स्प्रेसला थांबा मिळण्यास सुरुवात झाली. शनिवारी सकाळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी या रेल्वेला हिरवी झेंडी दाखविली. त्यावेळी सर्वपक्षीय नेतेमंडळी, कार्यकर्ते व नागरिकांनी एकच जल्लोष केला. गेल्या १५ वर्षांपासून शिंदखेडा शहरासह तालुक्यातून नवजीवन एक्स्प्रेसला थांबा मिळावा; अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून होत होती. यासाठी अनेकदा आंदोलने झाली. रेल्वे प्रशासनालाही प्रवाशांनी निवेदनही दिली होती. परंतु, त्याची दखल घेतली जात नव्हती. परंतु, आता रेल्वे प्रवाशांची प्रतीक्षा संपली असून नवजीवन एक्स्प्रेसला शिंदखेडा रेल्वे स्थानकावर आजपासून थांबा मिळण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी नऊ प्रवाशांनी सुरत, बडोदा व अहमदाबादकडे जाण्यासाठी या रेल्वेने प्रवास केला. यावेळी मनमाड-इंदौर रेल्वे मार्गादरम्यान पहिल्या फेजमध्ये नरडाणा ते धुळे टप्प्याचे काम होणार असल्याची माहिती मंत्री डॉ. भामरे यांनी दिली. यावेळी जि.प. सदस्य कामराज निकम, नगराध्यक्ष रजनी वानखेडे, प्रवासी संघर्ष समितीचे अध्यक्ष सलीम नोमानी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, शिंदखेडा शहरातील प्रतिष्ठीत व्यक्ती उपस्थित होते.
शिंदखेड्यात आजपासून ‘नवजीवन एक्स्प्रेस’ ला थांबा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:29 PM
रेल्वे प्रवाशांना दिलासा : केंद्रीय संरक्षणमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दाखविली हिरवी झेंडी
ठळक मुद्दे नवजीवन एक्स्प्रेसच्या स्वागतासाठी रेल्वे स्टेशनवर सर्व पक्षीय नेतेमंडळी व नागरिकांची उपस्थिती होती. नवजीवन एक्स्प्रेसचे शिंदखेडा रेल्वे स्थानकावर आगमन होताच फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली. यावेळी नेतेमंडळी व नागरिकांनी रेल्वेचे चालक अशोक आर. पटेल व परमानंद प्रसाद यांना व रेल्वेला पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले.