भिका पाटील ।शिंदखेडा : खान्देशातून संगीतकार म्हणून शिंदखेडा येथील संगीत पाटील याचा उदय झाला आहे. त्याने आतापर्यंत अनेक म्युझिक अल्बम स्वत: गाऊन संगीतबद्ध केले आहेत. त्यांची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील घेतली गेली आहे. नुकत्याच हिंदी चॅनलवर प्रदर्शित झालेल्या पिंजरा मालिकेचे टायटल साँग संगीत पाटील यांनी केले आहे. शिंदखेडासारख्या ग्रामीण भागातून हिंदी क्षेत्रात प्रचंड स्पर्धा असतांना देखील यशस्वी गरुडझेप घेणाऱ्या संगीत पाटील यांचे शिंदखेड्यासह संपूर्ण खादेशामधून कौतुक होत आहे.शिंदखेडा येथील एसएसव्हीपीएस महाविद्यालयातील लिपिक अनिल पाटील यांनाही संगीतात करियर करायचे होते. मात्र, घरची आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांनी नोकरी पत्करली. त्यांनी अनेक वर्षे स्वत:चा आॅर्केस्ट्राही काढला होता. त्यामुळे त्यांचा अनेक दिग्गज फिल्मी कलाकारांबरोबर संबंध आला होता. मात्र, परिस्थितीमुळे त्यांना संगीताची आवड असतानाही त्यापासून मुकावे लागले. त्याच आवडीमुळे त्यांनी मुलाचे नाव संगीत पाटील ठेवले. जी इच्छा वडिलांची अपूर्ण राहिली होती ती मुलगा म्हणून मी पूर्ण करीत असल्याचे संगीत पाटील याने सांगितले. त्यामुळे वडीलही खुश असल्याचे त्याने सांगितले.संगीत पाटील याचे माध्यमिक शिक्षण जनता विद्यालयात दहावीपर्यंत तर बारावीही येथील एसएसव्हीपीएस महाविद्यालयात केले. त्याला संगीत क्षेत्रात करिअर करायचे असल्याने वडील अनिल पाटील यांनी त्याला मुंबई विद्यापीठात संगीत महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यात त्याने संगीतातील बी.ए. डिग्री मिळवली. त्यानंतर ट्रिनीटी लंडन युनिव्हर्सिटी अंतर्गत मुंबई कॉलेजमध्ये वेस्टर्न, क्लासिकल शिक्षण घेतले व वयाच्या १८व्या वर्षी म्युझिक डायरेक्टर म्हणून करिअरला सुरवात केली. व ‘तू मिला’ या व्हिडीओ अल्बम मधील गीत स्वत: गाऊन संगीतबद्ध केले, हा त्याचा अल्बम देशभर गाजला. यानंतर ‘मूहँ दिखाई’ या लघुपट चित्रपटास संगीतकार म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली. यात पार्श्वगायिका रोंकिनी गुप्ता बरोबर संगीत पाटील यांनी गाणे कंपोज करून गायनही केले. या लघुपटास रसिकांनी भरभरून दाद दिली. यानंतर त्याने गणेश आरती नवीन स्वरूपात संगीतबद्ध केली. यात तानाजी, बाजीराव मस्तानी, पोवाडा फेम गणेश चंदनशिवे, पिंगा ग पोरी पिंगा पार्श्वगायिका वैशाली मढे, सचिन गायकवाड यांनी गायले आहे. लंडन युके फिल्म निर्मित ‘उड जा उड जा रे’ हा हिंदी अल्बम काढला. त्याला संगीत पाटील यांनी स्वत: गायन करून संगीतबद्ध केले. या अल्बमवर देशासह सातासमुद्रापार विदेशातील तरुण-तरुणींचे पाय थिरकले. या यशानंतर त्याने हिंदी मालिकेसाठी टायटल साँगही दिले आहे. शिंदखेडासारख्या ग्रामीण भागातून हिंदी सारख्या प्रचंड स्पर्धा असलेल्या क्षेत्रात संगीत पाटील यांनी यशस्वी गरुड झेप घेतली आहे. खानदेशातून संगीतकार म्हणून तो उदयास येत आहे. त्यामुळे या उदयोन्मुख कलाकाराचे शिंदखेडा, धुळेसह खादेशातून त्याचे कौतुक होत आहे.संगीत पाटील यांनी आतापर्यंत अनेक म्युझिक अल्बम स्वत: गाऊन संगीतबद्ध केले आहेत. नुकत्याच हिंदी चॅनलवर प्रदर्शित झालेल्या पिंजरा मालिकेचे टायटल साँगही त्यांनी केले आहे.
शिंदखेड्याचा संगीत पाटील संगीतकार म्हणून उदयास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2020 1:38 PM