धुळे : बहूजन क्रांती मोर्चाच्या भारत बंदला धुळे जिल्ह्यात बुधवारी सकाळी हिंसक वळण लागले आहे. शिरपूरला एसटी बसच्या काचा फोडण्यात आल्या; यात एक जण जखमी झाला. धुळ्यात टायर जाळल्याने आणि भंगार बाजार परिसरात मोठा जमाव जमल्यामुळे तणाव निर्माण झाला़ पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून अतिरिक्त कुमक देखील मागविण्यात आली आहे़सीएए, एनआरसी, एनपीआरला विरोध करण्यासाठी बहूजन क्रांती मोर्चातर्फे बुधवारी भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. भारत बंदचे आवाहन करण्यासाठी शिरपूरमध्ये काढलेल्या रॅलीदरम्यान बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास करवंद रस्त्यावर शिरपूर-पानसेमल एसटी बसवर दगडफेक झाली. यात बसच्या काचा फुटल्या. या घटनेत बोराडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे लॅब टेक्निशियन हेमंत काशिनाथ चितोडकर जखमी झाले़धुळे शहरात सकाळी साक्री रोडवर टायर जाळल्यामुळे तणाव निर्माण झाला. घटनेचे गांभिर्य ओळखून घटनास्थळी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.दरम्यान, सकाळी ११ च्या दरम्यान भंगार बाजार परिसरात शेकडोंचा जमाव अचानक जमल्याने तणाव आणखीनच वाढला आहे. पोलिसांनी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त लावला असून राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या बोलाविण्यात आल्या आहेत.भंगार बाजार, ८० फुटी रस्ता, देवपूर, वडजाई रोड, १०० फुटी रस्ता, साक्री रोड आदी भागात परिस्थिती चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे हे स्वत: शहरात सातत्याने गस्त घालत असून परिस्थिती हाताळत आहेत.
शिरपूरला बसवर दगडफेक, धुळ्यात टायर जाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 12:28 PM