साहिल खाटीक हा त्याच्या ४-५ मित्रांसोबत शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर लौकी धरणावर पिकनिकसाठी गेला. फिरत असताना तेथे असलेल्या पाझर तलावात पोहण्यासाठी ते उतरले, परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने अचानक पाय घसरल्याने साहिल पाण्यात बुडाला. त्यास मित्रांनी वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु तो प्रयत्न अयशस्वी झाला. त्यामुळे त्या मित्रांनी लागलीच घटनेची माहिती मोबाइलवरून खाटीक कुटुंबीयांना व शहर पोलिसांना दिली.
माहिती मिळताच शिरपूर पोलीस ठाण्याचे पीएसआय एस.बी. आहेर व कर्मचारी आणि नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाहेर काढून येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. डॉ.खान यांनी तपासून मृत घोषित केले़ याबाबत शिरपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घटनास्थळी व रुग्णालयात नातेवाईक, मित्र मंडळीनी गर्दी केली होती़ शहरातील आदी जनता शाळेतील मुख्याध्यापक फरहाद खाटीक यांचा एकुलता एक मुलगा होता. साहिल यावर्षी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता आणि निटचा अभ्यास करत होता.