लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : चीनच्या आडमुठे धोरणाच्या विरोधात मंगळवारी सकाळी शहरातून निषेध फेरी काढण्यात आली. या निषेध फेरीद्वारे शिवसैनिकांनी चीनी वस्तूंची खरेदी बंद करा, असे आवाहन धुळेकरांना करीत चीनचा निषेध नोंदविला. या निषेध फेरीत शहरातील व्यापारी मंडळी, नागरिक व युवकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत चीनच्या विरोधात घोषणाबाजी केली. शिवसेनेने यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की भारत आणि चीन यांच्यात डोकलाम सीमेवरून वाद सुरू आहे. त्यात चीनच्या आडमुठ्या भूमिकेमुळे भारतीय सैनिकांना सीमारेषेवर नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जीवाची पर्वा न करता आपले सैनिक २४ तास देशाची सेवा करत आहे. अशा परिस्थितीत चीनी सैनिक अहंकारीपणे भारतीय सैनिकांसोबत वाद घालत आहेत. याच चीनच्या भूमिकेचा निषेध नोंदविण्यासाठी ही निषेध फेरी काढण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी जिल्हा प्रमुख हिलाल माळी, लोकसभा संघटक महेश मिस्तरी, महानगरप्रमुख सतीश महाले, डॉ. माधुरी बाफना, गंगाधर माळी, संजय गुजराथी, सुनील बैसाणे, अॅड. पंकज गोरे, भूपेंद्र लहामगे, नरेंद्र अहिरे, रवींद्र काकड, किरण जोंधळे, प्रफुल्ल पाटील, राम कानकाटे भगवान गवळी, संदीप सूर्यवंशी, भगवान करनकाळ, आदी उपस्थित होते.
चीनच्या आर्थिक मुसक्या आवळणे गरजेचे!
आशिया खंडात भारतातील एकमेव अशी बाजारपेठ आहे. जिथे चीनची आर्थिक स्थिती अधिक बळकट होत आहे. चीनी वस्तू मोठ्या प्रमाणावर भारतात विकल्या जातात. अशा परिस्थितीत चीन भारतीय सैनिकांच्या जीवावर उठत आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत चीनच्या आर्थिक मुसक्या आवळणे गरजेचे आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले.