राजेंद्र शर्मा, धुळे: श्री एकविरा देवी यात्रोत्सवास बुधवार ५ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. पहिल्या दिवशी चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त कुळधर्म कुलाचार आरत्या मान मानता आणि जाऊळ कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी कुलस्वामिनी आई एकविरा देवीची रथातून पारंपारिक मार्गाने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्य विश्वस्त सोमानाथ गुरव यांनी दिली.
खान्देश कुलस्वामिनी आई एकवीरा मातेच्या चैत्र नवरात्रोत्सवास सुरुवात झाली आहे. बुधवारपासून तब्बल दोन वर्षाच्या कालावधीनंतर यात्रा भरणार आहे. यंदा विविध प्रकारचे पाळणे, मनोरंजनाची साधने, विविध प्रकारचे स्टॉल धारक यांची रेलचेल सध्या नदी पात्रात सुरु आहे. बुधवारी कुळधर्म कुळाचार आरत्या मानमानता जाऊळ, शेंडी उतरविणेचा कार्यक्रम मंदीर परीसरात होईल. भाविकांना उन्हाचा त्रास होवू नये यासाठी मंदीर परीसरात व मोकळ्या जागेत मंडपाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कुळधर्म कुळाचार आणि आरत्या तसेच स्वयंपाक कामी पिण्याच्या पिण्याची सोय मंदीर परीसरात ट्रस्ट आणि महापालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहे.
गुरुवारी चैत्र शु. पौर्णिमेस दुपारी आई एकवीरा मातेस महाअभिषेक व पाद्यपुजन महापौर प्रतिभा चौधरी आणि मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते होईल. श्री एकवीरा देवीची पालखी / रथ पुजन साक्रीच्या आमदार मंजुळा गावित व धुळे जिल्हा (शिंदे ) गट शिवसेनाप्रमुख डॉ. तुळशिराम गावित, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, शिवसेना (ठाकरे) गट युवा सेनेचे ॲड. पंकज गोरे यांच्या हस्ते हाईल. कार्यक्रमास उपमहापौर नागसेन बोरसे, शिवसेना (शिंदे) गट महानगरप्रमुख सतिष महाले व मनोज मोरे, भाजपाचे अनुप अग्रवाल,जयश्री अहिरराव, कैलास चौधरी उपस्थित राहतील.
रथ शोभायात्रा एकवीरा देवी मंदीरापासुन सरळ नेहरु चौकातुन आग्रारोडने मोठ्या पुलावरुन म. गांधीपुतळ्याकडुन नगरपट्टी मार्गाने ग.नं. ६ मधील तुकाराम व्यायाम शाळेपासुन चैनी रोड ने ग.नं. ४ मध्ये प्रवेश करेल तेथुन बालाजी मंदीर पारोळारोड रेलन क्लॉथ वरुन पुन्हा कराचीवाला खुंट - रामंदीर व सरळ मोठ्यापुलावरुन मंदीरात येईल. रथशोभायात्रेत यंदा आदीवासी कलावंतांचे टिपरी नृत्याचे पथक, वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळ ढोल ताशे, मंगल वाद्य अशा विविध प्रकारच्या कला पथकांचा सहभाग राहणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"