धुळे : युरोलॉजिस्ट तथा जागतिक पातळीवरील संशोधक डॉ. आशिष पाटील यांचे विविध संशोधन तथा नुकतेच पेंटेंट प्राप्त झालेली फाईव्ह पँग यंत्रणा अभ्यासण्यासाठी सिंगापूर येथील डॉक्टर धुळ्यात दाखल झाले आहेत. विदेशी डॉक्टर प्रशिक्षणासाठी धुळ्यात येण्याची ही पहिलीच वेळ आहे.डॉ. सुंदरम पलानीअप्पन धुळ्यात आले असून ते सिंगापूर येथील युरोलॉजिस्ट आहेत. शिक्षणासाठी त्यांना सिंगापूर सरकारतर्फे फेलोशील मिळाली आहे. त्यामाध्यमातून ते डॉ. पाटील यांनी संशोधित केलेले सिम्युलेटर, पीसीएनएलची पद्धत, फाईव्ह पँग तसेच डॉ. पाटील यांनी संशोधित केलेले विविध उपकरणांचा अभ्यास व सराव करीत आहेत़ डॉ. पलानी धुळ्यात महिनाभर वास्तव्यास आहेत.इंटरनॅशनल युरोलॉजी सोसायटीची ३८ वी जागतिक परिषदत दक्षिण कोरिया येथे आॅक्टोबर २०१८ मध्ये झाली होती. तीत जगभरातून दोन हजारहून अधिक युरोलॉजिस्ट सहभागी होते. डॉ. पाटील मार्गदर्शक म्हणून विशेष आमंत्रित होते. परिषदेत सिंगापूर येथील युरोलॉजिस्टची टीमही सहभागी होती. सहभागी युरोलॉजिस्ट डॉ. पाटील यांचे विविध संशोधन व नवीन संकल्पना पाहून प्रभावित झाले होते. सिंगापूरला परतल्यावर त्यांनी परिषदेचा आढावा तेथील डॉक्टरांसमोर मांडला. तसेच डॉ. पाटील यांचे विविध संशोधनाबद्दलही सांगितले. डॉ. पाटील यांच्या नवीन संकल्पना व संशोधनाबद्दल ऐकून डॉ. पलानीही प्रभावित झाले. त्यांनी डॉ. पाटील यांच्याशी ईमेल, मोबाईलवर संपर्क साधला. त्यानंतर २६ सप्टेंबर २०१९ मध्ये दिल्ली येथे झालेल्या युरोलॉजी सोसायटीच्या परिषदेत डॉ. पाटील यांच्या संशोधनाबद्दल अधिक माहिती जाणून घेत डॉ. पलानी यांनी धुळ्यात येण्याचा निर्णय घेतला.एकीकडे विदेशी तंत्रज्ञान अभ्यासण्यासाठी देशातील विविध डॉक्टर परदेशात जाण्यात धन्यता मानतात. असे असताना उच्च विद्याविभूषित विदेशी डॉक्टर धुळ्यातील संशोधित उपकरणे अभ्यासण्यासाठी भारतात येत आहेत. ही धुळ्यासह देशासाठी अभिमानाची बाब असल्याची माहिती डॉ़ आशिष पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली़आरोग्य क्षेत्रात सिंगापूर भारतापेक्षा प्रगत असला तरी डॉ. पाटील यांचे संशोधन पाहून सिंगापूरला युरोलॉजीत आणखीन काम करावे लागेल, असे वाटते. नाविण्यपूर्ण योगदानाबद्दल जागतिक युरोलॉजी क्षेत्र डॉ. पाटील यांचा ऋणी राहील, यात शंका नाही. डॉ. पाटील यांनी अजून नवीन संशोधन करावे व ते अभ्यासण्यासाठी मी पुन्हा धुळ्यात यावे, अशी मी अपेक्षा करतो.- डॉ. सुंदरम पलानीअप्पन, युरोलॉजिस्ट, सिंगापूऱ------------------------------------देशभरातील डॉक्टर सिम्युलेटर, फाईव्ह पँग आदी संशोधन जाणून घेण्यासाठी धुळ्यात येतात. परदेशी डॉक्टर धुळ्यात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. देश- विदेशातील डॉक्टरांना नवीन संशोधनाचा फायदा होत आहे, ही निश्चितच समाधानाची बाब आहे. भावी डॉक्टरांनी या संशोधनांचा फायदा घेऊन शस्त्रक्रियेचा खर्च कमी करणे, हा संशोधनाचा मूळ उद्देश आहे.- डॉ. आशिष पाटील, युरोलॉजिस्ट, धुळे़
संशोधनासाठी सिंगापूरचे डॉक्टर धुळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 10:39 PM