पोलीस यंत्रणेतील जुनी यंत्रणा आता बाद होताना दिसत आहे़ गुन्हेगारी जगतात बदल होत असल्यामुळे पोलिसांनीदेखील स्वत:मध्ये आमूलाग्र बदल करण्याचे धोरण आखलेले आहे़ त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यासाठी २२ कार आणि १२ दुचाकी या प्राप्त झालेल्या आहेत. या कारमध्ये आवश्यक ती सर्व प्रकारची अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याने मदत मागणा-या नागरिकांपर्यंत हे वाहन अवघ्या १० ते १२ मिनिटात पोहोचू शकणार आहे़ त्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षणदेखील पोलिसांना देण्यात सुरुवात झाली आहे़ या वाहनांचे उद्घाटन महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आणि पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या उपस्थित करण्यत आले आहे़
कॉल येताच कळणार लोकेशन
ज्या नागरिकांना पोलिसांची मदत पाहिजे असेल त्यांना केवळ ११२ क्रमांक डायल केल्यास त्यांचे नेमके लोकेशन दिसणार आहे़ त्यानुसार कोणते पोलीस स्टेशन त्याच्या जवळ आहे त्या पोलीस ठाण्यात त्याची माहिती जाईल आणि पोलीस वाहन त्या नागरिकांपर्यंत अवघ्या १० ते १२ मिनिटात पोहोणार आहे़
२२ चारचाकी, १२ दुचाकी
चार तालुक्याचा असलेल्या धुळे जिल्ह्यात १६ पोलीस ठाणे आहेत. त्यानुसार गृह विभागाकडून धुळे पोलीस विभागाला २२ चारचाकी आणि १२ दुचाकी देण्यात आलेल्या आहेत. संबंधित पोलीस ठाण्यापर्यंत ही वाहने रवानादेखील करण्यात आलेली आहेत़
कर्मचा-यांना विशेष प्रशिक्षण
पोलीस विभागाकडे अत्याधुनिक अशी वाहने उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत़ त्या वाहनात गरजेनुसार सर्व सुविधा देण्यात आल्यामुळे त्याचा योग्य असा वापर करणे हे देखील महत्त्वाचे आहे़ त्याचा वापर केव्हा आणि कसा करावा, यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यातून ४ ते ५ कर्मचा-यांना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण देण्याचे काम सध्या सुरू झालेले आहे़
पोलीस मदत हवी असल्यास ११२ डायल करा
- आपत्कालीन प्रसंग ओढवल्यास नागरिकांनी न घाबरता पोलिसांची मदत हवी असल्यास केवळ ११२ क्रमांक डायल करावा. लागलीच त्यांना मदत पोलिसांकडून मिळू शकणार आहे.
- नागरिकांनी हा क्रमांक डायल केल्यानंतर तो कॉल जर फेक असेल हे देखील पोलिसांना कळणार असल्यामुळे खरोखरच मदत हवी असल्यास नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यायला हवा.
कोटसाठी
शहरासह जिल्ह्यातील नागरिकांसाठी पोलीस सदैव तत्पर आहेत़ आवश्यक त्या सुविधा पोलिसांना पुरविण्यात येत आहे. परिणामी गुन्हेगारांवर वचक निर्माण केला जात आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कुठे निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल़
- चिन्मय पंडित, पोलीस अधीक्षक