लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : जुन्या भांडणाच्या वादातून दाखल तक्रारीसंदर्भात पोलिसांनी बोलविले होते. म्हणून पोलीस स्टेशनला जाणाºया अशोक सूर्यवंशी यांना गुप्तीने वार करुन जखमी केल्याची घटना शिंदखेडयात जानेवारी २०१३ मध्ये घडली होती. या गुन्ह्यात शिंदखेडा न्यायालयाने हल्ला करणाºया सहाही आरोपींना एक वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी २ हजाराचा दंडाची शिक्षा ठोठाविला. शिंदखेडा न्यायालयाचे न्यायाधीश दस्तगीर रा. पठाण यांनी हा निकाल मंगळवारी दिला. शिंदखेडा येथे १० जानेवारी २०१३ रोजी सतीश भास्कर वडर याने पूर्व वैमनास्यातून झालेल्या भांडणासंदर्भात अशोक बंडू सूर्यवंशी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीसंदर्भात पोलिसांनी अशोक बंडू सूर्यवंशी यांना पोलीस स्टेशनला बोलविले होते. त्यानुसार दुपारी दीड वाजेच्या सुमारास मोटारसायकलीने पोलीस स्टेशनला जात असतांना. वरपाडे रोडवर पोलीस लाईन समोरून भास्कर वडरसह सहा जणांनी सूर्यवंशी यांचा रस्ता अडविला. शिवीगाळ करीत गुप्तीने वार करुन त्यांना जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी सूर्यवंशी यांनी शिंदखेडा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरुन भास्कर कौतिक वडर, सतीश भास्कर वडर, शंकर भास्कर वडर, देविदास भास्कर वडर, काशिनाथ राजाराम शिंदे, सोनू रमेश शिंदे या सहा जणांविरुद्ध गुन्हा भा द वी कलम ३२४, ३४१, १४८, ५०६(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.प्रकरणाचा तपास पूर्ण करुन पोलीस उपनिरीक्षक विजय महाले यांनी दोषारोपपत्र शिंदखेडा न्यायालयात सादर केले होते. खटल्याचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीश दस्तगीर रा. पठाण यांनी वरील सहा जणांना दोषी ठरवून एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा आणि प्रत्येकी दोन हजार दंडाची शिक्षा ठोठावली. शासनातर्फे सरकारी वकील एम वाय पाडवी यांनी कामकाज पाहिले.
गुप्तीने वार करुन जखमी केल्याप्रकरणी सहा जणांना एक वर्ष सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 10:57 PM