आॅनलाइन लोकमतसाक्री (जि.धुळे) : साक्री व निजामपूर येथील किराणा दुकानदारांची उधारी वसूल करून जाणाºया धुळे येथील व्यापाºयाचे २ लाख ७० हजार रुपये लुटल्याची घटना रविवारी भरदिवसा घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद साक्री पोलिसात करण्यात आली आहे. तसेच विजापूर या गावातही धाडशी चोरी झाली असून या चोरी मध्ये १ लाख २५ हजार रुपये रोख एक लाखाची चांदी व ६० हजाराचे सोने लुटून नेले आहे.धुळे येथील नकाने रोडवर असलेल्या रवींद्र अँड सन्सचे मालक अमोल रवींद्र भोकरे यांचा किराण्याचा होलसेल व्यापाºयाचा व्यवसाय आहे. ते किराणामाल साक्री व निजामपूर येथील दुकानदारांना उधारीने देतात. सध्या लॉकडाऊन असल्याने गेल्या अनेक दिवसापासून त्यांची वसुली झालेली नव्हती. १९ रोजी साक्री येथील किराणा दुकानदारांकडून वसुली करून ते निजामपूर येथे वसुलीसाठी जात होते. कळंभीर जवळ असलेल्या रायपूर घाटात एमएच १८-वाय ८३१९ क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांच्या दुचाकीला धडक दिली व त्यांना मारहाण करण्यास सुरवात केली केली. यावेळेस मागून परत एका दुचाकीवरून तीन जण आले. या सर्वांनी तोंडाला फडके बांधलेले होते. ते मराठी अहिराणी मिश्रित भाषा बोलत होते. यावेळेस त्यांनी व्यापाºयाच्या दुचाकी मधील डिकीतून वसुलीचे २ लाख ७० हजार रुपये काढून घेत तेथून पळ काढला. ही घटना दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली आहे. सध्यारस्त्यावर तुरळक वाहतूक सुरु असल्याने चोरट्यांनी या संधीचा फायदा घेत ही लूट केली आहे. विजापूर येथील ठेलारी समाजाच्या एका इसमाच्या घरातून ही रात्री धाडसी घरफोडी झाली. तेथून सोन्या-चांदीचे असे चोरून नेले आहेत. या दोन्ही घटनांची नोंद साक्री पोलिसात करण्यात आली आहे.दरम्यान तालुक्यात घडलेल्या या घटनांमुळे खळबळ उडालेली असून, पोलिसांनी व्यापाºयाला लुटणाऱ्यांचा तसेच धाडसी घरफोडी करणाºयांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी होऊ लागली आहे.
धुळ्याच्या व्यापाऱ्याला सहा जणांनी लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 12:19 PM