धुळे : तापी पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला तावखेडा फाट्याजवळ रविवारी गळती लागल्याने १५ लाख लीटर पाणी वाया गेले. विशेष म्हणजे याच ठिकाणी ही सहाव्यांदा गळती लागल्याचे सूत्रांनी सांगितले. शहरातील ६0 टक्के भागाला तापी योजनेवरून पाणीपुरवठा केला जातो. रविवारी तापी पाणीपुरवठा योजनेच्या सुकवद रॉ वॉटर पंपिंग स्टेशनजवळ तावखेडा फाट्याजवळील शेतातील मुख्य जलवाहिनीला मोठय़ा प्रमाणावर गळती लागली. जीवन प्राधिकरणाकडे ही योजना असताना याच ठिकाणी तीन वेळा, तर मनपाकडे हस्तांतरित झाल्यानंतरही पुन्हा तीन वेळा गळती लागली. त्यामुळे रविवारी लागलेल्या गळतीमुळे साडेचार ते पाच फुटांचा संपूर्ण पाईपच बदलविण्यात आला. यासाठी एक लाख ८७ हजार रुपयांचा खर्च महापालिकेला करावा लागला आहे. सकाळी साडेनऊ वाजेपासून गळतीच्या दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. १५ लाख लीटर पाणी वायागळतीतून सुमारे १५ लाख लीटर रॉ वॉटरची नासाडी झाली. ही गळती सुकवद पंपिंग स्टेशनपासून जवळच असल्याने त्वरित पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यामुळे अधिक पाणी नासाडीचा धोका टाळता आला. पाणीपुरवठा प्रभावतीदेवपूर भागातील एम.बी.आर. जलकुंभ, नवरंगजलकुंभ, नेहरूनगर जलकुंभ तसेच बडगुजर जलकुंभ, मायक्रोवेव्ह जलकुंभ, बडगुजर जलकुंभ, मालेगाव रोडवरील पंपिंग स्टेशन, दसेरा मैदान जलकुंभ, चक्करबर्डी जलकुंभ, मोहाडी उपनगर जलकुंभावरून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. मंगळवारी ३ फेब्रुवारी रोजी पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी सांगितले.२५ गळत्या काढल्यागेल्या वर्षी पाणीपुरवठा विभागाने या २५ वर गळत्या काढून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. अद्यापही या जलवाहिनीवर दोन ठिकाणी मोठय़ा गळ्त्या आहेत. त्यात सोनगीरजवळील टोलनाका व ढंढाणे फाट्याजवळील गळतीचा समावेश आहे.
------
धुळे शहरातील ६0 टक्के भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी १९८९ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या साहाय्याने तापी पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे. यासाठी सुखवद येथे पंपिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. तेथून मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली आहे. ही जलवाहिनी एमबीआर जलकुंभापर्यंत आणली आहे. एक हजार मि.मी.ची ही जलवाहिनी आहे. ती अत्यंत जीर्ण झाली आहे. त्यामुळे तिला बदलण्याची गरज आहे. परंतु यासाठी २५ कोटींवर खर्च अपेक्षितआहे. त्यामुळे महापालिकेला सद्य:स्थितीत ती जलवाहिनी बदलणे शक्य नाही.