लोकमत आॅनलाईन धुळे : शहरातील मालेगाव रोडवरील यलम्मा देवी मंदीर परिसरातील दूध डेअरीवर दुचाकीवर आलेल्या तिघांनी गोळीबार करून गल्ल्यातील रोकड लुटून नेली. ही घटना गुरूवारी रात्री साडेनऊ-पावणेदहा वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने कोणी जखमी झालेले नसून परिसरात भयाचे वातावरण आहे. मालेगावरोडवरील यलम्मादेवी मंदीराजवळ विठ्ठल (अप्पा) गवळी यांची न्यू प्रतीक डेअरी आहे. संध्याकाळी ६ ते १० यावेळेत दूध विक्री होते.गुरूवारी साडेनऊ-पावणेदहा वाजेच्या सुमारास अग्रसेन चौकाकडून दुचाकीवरून तिघे जण आले. त्यांनी काऊंटरच्या काचेवर पिस्तुलातून गोळी झाडली. त्यामुळे गल्ल्यावर बसलेले मालक विठ्ठल गवळी व कर्मचा-यांची भीतीने बोबडी वळाली. ते गल्ल्यावरून उठताच दोघांनी गल्ल्यातील रोकड ताब्यात घेऊन लगेच दुचाकीवरून दसेरा मैदानकडे जाणा-या रस्त्याने पळ काढला. मालक व कर्मचा-यांनी पाठलाग करू नये यासाठी दोघांपैकी एकाने फरशी उचलून दुकानाच्या दिशेने फेकली आणि लगेच पळ काढला. दरम्यान गोळीबाराच्या आवाजाने परिसर हादरला. थोड्याच वेळात डेअरीजवळ परिसरात नागरिकांची गर्दी झाली. दुकानदारांनी तत्काळ दुकाने बंद केली. वृत्त कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे, चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे हे फौजफाट्यासह घटनास्थळी पोहचले. माहिती घेऊन रात्री उशीरापर्यंत लुटारूंचा शोध व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.