येथील कै. डॉ. पां. रा. घोगरे विज्ञान महाविद्यालयात म्युकरमायकोसिस या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी डॉ. जापत्ती बोलत होते.
डॉ. जापत्ती पुढे म्हणाले की, म्युकरमायकोसिस या संसर्गामुळे नाक, कान, डोळा किंवा अगदी मेंदूपर्यंत संसर्ग पोहोचून अर्धांग वायूचा झटका किंवा डोळे काढण्यापर्यंत वेळ आली आहे. एखाद्या आजारपणामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी झाली असेल, तर हे संक्रमण बहुतेक वेळा उद्भवते. याकरिता उपचार घेणे महत्त्वाचे आहे. उपचार न घेतल्यास ‘म्युकरमायकोसिस’ प्राणघातक ठरू शकतो.
डॉ. उमेश तोरणे म्हणाले, आजाराची लक्षणे दिसल्यास आपल्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नाक, कान, घसातज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी. वेळीच निदान झाल्यानंतर योग्य उपचार घेतल्यास हा आजार पूर्ण बरा होतो.
प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. एम. व्ही. पाटील म्हणाले की, तुमची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली, तरी घाबरून जाऊ नका. तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल, तर नियमितपणे रक्तातील साखर मोजा. ऑक्सिजनची पातळी नियमितपणे बघत चला. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार घ्या. सूत्रसंचालन प्रा. के. एम. बोरसे यांनी केले. डॉ. प्रवीण महाले यांनी आभार मानले. प्रा. अमित बिरारीस, डॉ. संभाजी पाटील, डॉ. हर्षल भामरे, डॉ. राकेश देवरे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.