धुळे : माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरर हा एका ऑनलाइन गेमिंगची जाहिरात करत असून, हा ऑनलाइन गेम एक प्रकारचा जुगार आहे. या जुगारामुळे अनेक कुटुंब उद्धवस्त होत आहेत. सचिन तेंडुलकरला भारत देशाचा सर्वोच्च असा भारतरत्न पुरस्कार मिळाला असून, अशा पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीने अशी जाहिरात करणे योग्य नाही. त्यामुळे सचिन तेंडुलकरने या जाहिरातुन बाहेर पडावे, अन्यथा त्यांना मिळालेला मिळालेला भारतरत्न हा पुरस्कार परत करावा, अशी मागणी आमदार तथा प्रहार संघटनेचे नेते बच्चु कडु यांनी बुधवारी धुळ्यात आयोजित पत्रकार परिषदेद्वारे केली. अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याची माहितीदेखील त्यांनी यावेळी दिली.
धुळ्यातील जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पुढे त्यांनी सांगितले की,सचिन तेंडुलकर हे भारतरत्न असल्यामुळं आम्ही हे आंदोलन केले. ते फक्त क्रिकेटपटू असते तर आम्हाला आंदोलन करायची गरज नव्हती. मात्र, ते भारतरत्न आहेत. त्यांच्याकडं नवी पिढी आदर्श म्हणून पाहते. या देशात भगतसिंहअण्णाभाऊ साठे यांना आजुन भारतरत्न मिळालेला नाही. तर ज्यांना भारतरत्न मिळाला, त्यांनी गैरफायदा का घ्यावा? सचिन यांना जाहिरात करायचीच असेल, तर त्यांनी आधी भारतरत्न परत करावा, अशी मागणी कडू यांनी केली आहे.
…तर गणेशोत्सवात सचिनसाठी भीकपेटी
एक क्रिकेटपटू म्हणून सचिन तेंडुलकर यांचा आम्हाला अभिमानच आहे, पण भारतरत्न सचिन यांनी ऑनलाइन जुगाराची जाहिरात करणं योग्य नाही. त्यांनी एकतर भारतरत्न परत करावा किंवा जाहिरातीतून बाहेर पडावं. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील बस स्टॉप व गणेश मंडळाजवळ तेंडुलकर यांच्या नावानं भीकपेटी व सूचना पेटी लावण्यात येईल, यातुन जमा झालेले पैसे सचिन तेंडुलकरला मदत म्हणुन देणार असल्याचेही बच्चू कडु यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.