सुरेश विसपुते
धुळे : जे काम पूर्वी केवळ पुरूष करत होते, अशी अनेक कामे सध्या महिला लिलया करू लागल्या आहेत. टपाल वाटपाचे कामही त्यातच मोडणारे. त्यामुळे पोस्टमन हा शब्द रूढ झाला. परंतु आता टपाल खात्यातील विविध कामांची जबाबदारी महिला समर्थपणे पेलत आहेत. शहरातील मुख्य टपाल कार्यालयांतर्गत येणाºया मोहाडी विभागात ज्योती अमृत सोनवणे या गेल्या चार वर्षांपासून कार्यरत असून नागरिकांना टपाल वाटप करण्याच्या कामात समाधान मिळते, असे त्यांनी सांगितले. मोहाडी विभागातील त्या पहिल्याच महिला टपाल कर्मचारी आहेत. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला, तेव्हा आपले अनुभव व्यक्त केले. मोहाडी उपनगर विभागात पोस्ट मास्तर एस.एम. जाधव यांच्या मार्गदर्शनात दोन कर्मचारी कार्यरत असून ते सुमारे ३० हजार लोकसंख्या असलेल्या मोहाडी उपनगरात टपाल वाटप करतात. नागरिकांना आमच्या माध्यमातून आप्तांची ख्यालीखुशाली कळते, नोकरीचा कॉल, आनंदाची बातमी देणारे पत्र असेल ते संबंधितांपर्यंत पोहचवून त्यांना आनंदाची बातमी देण्याच्या या कामात आंतरिक समाधान मिळते, असे सोनवणे यांनी सांगितले. एका वृद्धेचा मुलगा कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याने आईला पत्र लिहिले. परंतु तिला पत्र वाचता येत नव्हते. तिला ते पत्र वाचून दाखविले. मुलाची खुशाली कळाल्याने तिच्या चेहºयावर आनंद पसरला. असा अनुभव नित्याचा असल्याने या कामाबद्दल मी अत्यंत समाधानी आहे. सकाळी १०.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत गावात टपाल वाटप होते. त्यानंतर कार्यालयात येणाºया नागरिकांना माहिती देणे, मदत करणे अशी कामे सुरू असतात. मनमिळावू स्वभावामुळे आपणास कामात कधी अडचण आली नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. वडील एस.टी. महामंडळात कर्मचारी असून आई गृहिणी आहे. त्यांच्यासह दोन बहिणी, दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. माझ्या या कामामुळे आई-वडिलांना मदत होते, असेही ज्योती सोनवणे यांनी सांगितले. काम सर्वश्रेष्ठ असते. त्यामुळे कोणत्याही कामाची लाज न बाळगता आवड असलेल्या कोणत्याही क्षेत्रात कार्यरत रहावे. महिलांना आता सर्व क्षेत्र खुली होत आहेत. त्याचा लाभ उठवून महिलांनी विविध क्षेत्रात पुढे जावे, असा संदेश त्यांनी युवती व महिलांना दिला.