धुळे : सोयाबीनच्या दरात दिवसेंदिवस घसरण सुरूच असून, भविष्यात सोयाबीनचा भाव पाच हजारांपर्यंत घसरण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. सोयाबीनला सध्या ६ हजार ७०० रुपये भाव मिळत आहे.
नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनचा पीकपेरा जिल्ह्यात वाढत आहे. परंतु यंदा दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. सध्याचा दर स्थिर राहतो की घसरतो हे बेमोसमी पावसावर अवलंबून असणार आहे. पाऊस असाच सुरू राहीला तर सोयाबीनचा दर्जा घसरेल आणि बाजारात त्याचा दर ५ हजारांपर्यंत खाली जाईल, अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. परंतु जानेवारीनंतर सोयाबीनच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. शेतकरी थांबले तर फायदा होऊ शकतो.
खोऱ्याने पैसा ओतला, आता काय करू?
यंदाच्या हंगामात पीकपेरा झाल्यानंतर पावसाने दडी मारली. त्यामुळे वाढ खुंटली. सध्या सततच्या पावसानेही सोयाबीनला फटका दिला आहे. उत्पन्नात घट येणार आहे आणि आता दर घसरल्याने चिंता वाढली. दर घसरल्याने खर्चदेखील निघेल की नाही अशी शंका आहे.
- शरद सोनवणे, शेतकरी, नेर
कमी कालावधीत येणारे नगदी पीक आणि भाव चांगला मिळतो म्हणून सोयाबीनचा पेरा केला. परंतु निसर्गाने तर फटका दिलाच शिवाय दर देखील कमी झाल्याने पीक घेण्यासाठी येणारा खर्च आणि उत्पन्न यात मोठी तफावत असणार आहे. विक्री करावी की थांबावे असा प्रश्न पडला आहे.
- जगदीश अहिरराव, शेतकरी, धाडणे ता. साक्री
विकण्याची घाई करू नका!
सध्या पाऊस सुरू असल्याने आवक फारसी नाही. त्यामुळे दर ६ हजार ७०० ते ६ हजार ८०० पर्यंत स्थिर आहेत. परंतु पाऊस बंद झाला आणि कडाक्याचे ऊन पडले तर सोयाबीनची आवक वाढेल आणि दरांमध्ये घसरण होईल. सोयाबीनचा दर ५ हजारांपर्यंत खाली येऊ शकतो. चालू महिन्यातच दरांमध्ये घसरण होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु जानेवारीनंतर दरवाढीची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी विकण्याची घाई करू नये.
- विजय चिंचोले, व्यापारी