मालपूर : पावसाने चांगली उघडीप दिल्यामुळे शेतशिवारातील शेती उत्पन्न घरादारात आणण्यासाठी शेतकऱ्यांची मालपूर परिसरात शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. त्यातच निवडणूक असल्यामुळे मजुरांची टंचाई भासू लागली आहे.यावर्षी मृग व आद्रा नक्षत्र सोडले तर सर्वच नक्षत्रात जोरदार पाऊस झाला आहे. परिणामी जास्त पावसामुळे शेती उत्पन्नात प्रचंड घट झाल्याचे शेतकरी सांगतात. मात्र जे आहे ते शेती उत्पादन काढण्यासाठी शेतकºयांची एकच धडपड दिसून येत आहे.बाजरी लाणी करणे व लाणी झालेले शेती पिक थ्रेशरच्या माध्यमातून काढणे या कामाला चांगलीच गती मिळाली आहे.कापूस वेचणीला देखील येथील परिसरात सुरुवात झाली आहे. ओला झालेल्या कापसाला मजुरीचा खर्च वाढला असून मजुर देखील जास्त लागत आहेत. मात्र येथे हळुहळु विधानसभा निवडणुकीत रंग भरु लागला असल्याने काही हौशी मजुर आपल्या ठेवणीतील कपडे अंगावर चढवून प्रचारात रमल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीत अधिक काम मिळत असल्याने ते सध्या कामात व्यस्त असल्याने शेतीच्या कामांसाठी त्यांची टंचाई भासत आहे.
शेती उत्पादन काढण्यास दिली गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 1:37 PM