धुळे - भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक आणि कारची धडक झाली. यात कारमधील ७ प्रवासी जखमी झाले. ही घटना शिरपूर-चोपडा रस्त्यावरील तोंदे शिवारात शनिवारी रात्री घडली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. अपघाताला कारणीभूत असलेल्या ट्रक चालकाविरोधात रविवारी थाळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
एमएच १८ बीझेड ६४८८ क्रमांकाचा ट्रक शिरपूरकडून भरधाव वेगाने येत होता. शिरपूर-चोपडा रोडवरील तोंदे शिवारात अनेर नदीच्या पुलाजवळ समोरून येणारी एमएच १८ बीसी ४३२१ क्रमांकाच्या कारला आरशाला ट्रक चालकाने कट मारला. त्यामुळे कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि अनेर पुलाच्या कठड्याला कार ठोकली जावून अपघात झाला. कारचालकासह कारमध्ये बसलेले प्रवासी यांना गंभीर दुखापत झाली. ही घटना शनिवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात राधेशाम कसाराम उर्फ केगडा पावरा, अविनाश बुधा पावरा, संजय गंगाराम पावरा, तोताराम मोतीलाल पावरा, अजित भीमसिंग पावरा, माेहन भगवान कोळी, विनोद सखाराम पावरा (सर्व रा.शिरपूर) यांना दुखापत झाली. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यात कारचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.
राधेशाम कसाराम उर्फ केगडा पावरा यांनी थाळनेर पोलिसात रविवारी दुपारी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, शाहबाजखान अरीफखान (वय २८,रा. बलगव, कसरावद, जि. खरगोन, मध्यप्रदेश) या ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.