लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरात अमृत योजनेंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेल्या हरीत क्षेत्र विकास (उद्यान) कामांसाठी कार्यादेश देण्यात येऊनही कामे सुरू झाली नव्हती़ त्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त दिल्यानंतर आयुक्तांनी ठेकेदारांना नोटीसा बजाविल्या होत्या़ त्यानंतर अखेर उद्यानांच्या कामांना मुहूर्त मिळाला आहे़शहरात अमृत योजनेंतर्गत हरीत क्षेत्र विकसित करण्यासाठी शासनाने ३ वर्षात जवळपास ४ कोटी रूपयांचा निधी मनपाला दिला आहे़ मात्र तिन्ही वर्षात आतापर्यंत एकही काम सुरू करण्यात आले नव्हते़ शासनाने ठरवून दिलेली कालमर्यादा संपुष्टात येत असतांनाही त्याकडे दुर्लक्ष होत होते़ त्याबाबतचे वृत्त लोकमतने ७ फेब्रुवारीला प्रसिध्द केले होते़ त्यानंतर आयुक्त सुधाकर देशमुख यांनी लागलीच ठेकेदारांना नोटीसा बजावून दंडात्मक कारवाईसह काळया यादीत टाकण्याचा इशारा दिला होता़ परंतु अखेर हरीत क्षेत्र विकासाच्या कामांना ठेकेदारांकडून प्रारंभ करण्यात आल्याचे दिसून येत आहे़ तिन्ही वर्षांसाठी मिळालेल्या निधीतून एकूण ३० ठिकाणी उद्यानांची निर्मिती केली जाणार आहे़‘अमृत’ अभियानांतर्गत मनपाला हरीत क्षेत्र विकासासाठी २०१६-१७ या आर्थिक वर्षात १ कोटी ६८ लाख १५ हजार ५१८ रूपयांचा तर २०१७-१८ साठी २ कोटी ३३ लाख ६१ हजार २७८ रूपयांचा निधी मंजूर आहे़ अमृत अभियानांतर्गत हरीत क्षेत्र विकास केला जाणार असल्याने त्यात केंद्र सरकार ५० टक्के, राज्य शासन २५ टक्के व मनपा हिस्सा २५ टक्के अशी विगतवारी आहे़
धुळे शहरात अखेर उद्यानांच्या कामांना प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 4:27 PM
आयुक्तांनी दिली होती ठेकेदारांना नोटीस, ३० ठिकाणी होणार हरीत क्षेत्र विकास
ठळक मुद्दे- तीन वर्षात शासनाकडून ४ कोटी रूपयांचा निधी- शहरात ३० ठिकाणी होणार हरीत क्षेत्रांचा विकास- ठेकेदारांना नोटीसा बजाविल्यानंतर कामांना सुरूवात