धुळे : शहरातील चाळीसगाव रोडवरील आयशा नगरातून चाळीसगाव रोड पोलिसांनी पिकअप वाहन हस्तगत केले. शिताफीने चोरट्याला पकडले. त्याची चौकशी केली असता हे वाहन बीड शहरातून चोरून आणल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. नाजीम मलक अब्दुल (वय ३६, रा. मिल्लत नगर, धुळे) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. शहरातील चाळीसगाव रोडवरील आयशानगरात नॅशनल हायस्कूलजवळील करीम मच्छीवाला याच्या घराशेजारील रोडावर एक पिकअप वाहन संशयितरीत्या लावलेली आहे. ते वाहन चोरीचे असल्याची गोपनीय माहिती चाळीसगाव रोड पोलिस निरीक्षक धीरज महाजन यांना मिळाली होती. त्यानुसार, शनिवारी पोलिसांनी आयशा नगरात जाऊन चौकशी केली असता संशयित वाहनासह एक जण मिळून आला.
नाजीम मलक अब्दुल (वय ३६, रा. मिल्लतनगर, धुळे), असे त्याचे नाव आहे. संशयित वाहनाबाबत अधिक विचारणा केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक धीरज महाजन यांनी वाहन क्रमांकावरून खात्री केली असता संबंधित वाहन हे बीड येथील असल्याचे समजले. अधिक चौकशी केली असता त्याने बीड शहरातून पिकअप व्हॅन चोरून आणल्याची कबुली पोलिसांना दिली. यासंदर्भात बीड शहर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे तपासातून समाेर आले. त्यानुसार चोरीच्या गुन्ह्यात संशयित नाजीम मलक अब्दुल याला ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्याच्याकडून ३ लाख रुपये किमतीचे पिकअप व्हॅन हस्तगत करण्यात आले. अटकेतील चोरटा हा सराईत असून त्याच्या अटकेमुळे जिल्ह्यातील अन्य चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा होणार आहे. संशयितासह चोरीचे वाहन पुढील तपासासाठी बीड शहर पोलिसांकडे सुपुर्द करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक धीरज महाजन यांनी दिली.
पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक धीरज महाजन व त्यांच्या पथकातील पंकज चव्हाण, संदीप पाटील, बी. आय. पाटील, चेतन झोळेकर, स्वप्नील सोनवणे, इंद्रजित वैराट, शरद जाधव, पवार यांनी कारवाई केली.