लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील मौलवीगंज भागात दुपारी पोलिसांच्या गस्तीपथकावर एका टोळक्याने दगडफेक केल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती़ ही घटना महापालिकेच्या शाळा क्रमांक २५ च्या परिसरात घडली़ घटनेची माहिती मिळताच जादा पोलीस कुमकसह अधिकाऱ्यांनी धाव घेतली़ दगडफेक करणाºयांमध्ये ८ ते १० जण असून घटनेनंतर ते फरार झाले आहेत़ पोलीस त्यांच्या मागावर आहेत़सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, पोलीस यांच्यासह अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी देवदुतांच्या भूमिकेत असताना त्यांच्यावर हल्ला करणे ही बाब निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया आता उमटू लागलेली आहे़ कोरोनाचा संसर्ग पसरु नये म्हणून आपला जीव धोक्यात टाकून पोलीस आपले रक्षण करत असताना त्यांच्यावर हल्ला करण्याची बाब कितपत योग्य आहे, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे़ कोरोनामुळे शहरात जमावबंदी, संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे़ एप्रिलचे कडक उन अंगावर झेलत पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत़ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील गस्ती पथकाचे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी गस्त घालत होते़ दुपारी आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौलवीगंज भागातील महापालिकेच्या शाळा क्रमांक २५ जवळील मैदानात काही तरुण क्रिकेट खेळत होते़ गस्तीपथकातील पोलीस कर्मचाºयांनी त्यांना हटकले़ त्यामुळे क्रिकेट खेळणारे तेथून निघून गेले़ परिणामी पोलिसही त्या ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी निघाले़ मात्र, अचानक १० ते १२ जणांच्या टोळक्यातील काहींनी पोलिसांवर दगडफेक केली़ सुदैवाने या दगडफेकीत एकही पोलीस जखमी झालेले नाही़ मात्र, दगडफेक होताच पोलीस देखील या प्रकारामुळे अर्लट झाले़या दगडफेकीच्या घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाºयांना कळविण्यात आली़ माहिती मिळताच शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, आझादनगर पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि अन्य पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला़ दगडफेकीच्या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आलेला आहे़ दगडफेक करणारे पळून गेले़दरम्यान, अचानक घडलेल्या या घटनेमुळे मौलवीगंज भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात एकच चर्चा सुरु आहे़संशयितांची धरपकड सुरुपोलिसांवर दगडफेक केल्यानंतर पळून गेलेल्यांचा शोध आता पोलिसांकडून सुरु झाला आहे़ त्यांची धरपकड केली जाणार असून त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्याची माहिती दिनेश आहेर यांनी दिली़
दगडफेकीमुळे मौलवीगंजमध्ये तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 9:37 PM