धुळे : पिंपळनेर येथील एकलव्य रेन्सीडेन्सी पब्लीक स्कूलमधील इयत्ता दुसरीमधील रविराज देसाई या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने संबंधित दोषी मुख्याध्यापक व व्यवस्थापक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आदिवासी समाजाने केली आहे़ तर, संबंधित विभागाचे अधिकारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सर्व संघटनेचे कार्यकर्ते, समाजबांधवांनी स्पष्ट केले़ परिणामी ग्रामीण रुग्णालयात तळ ठोकून बसले आहे़ पिंपळनेर ते सामोडे रस्त्यावर एकलव्य रेसिडेन्सी पब्लीक स्कूल आहे़ या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता दुसरीमधील रविराज मांगिलाल देसाई (८) याचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ निर्माण झाली़ या घटनेची माहिती संघटनांच्या पदाधिकाºयांना मिळताच पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात एकच गर्दी जमा झाली होती़ रविराज हा गावाहून ३० जुलै रोजी शाळेत दाखल झाल्याचे सांगण्यात येते़ त्याची तब्येत बरी नसल्याने त्याला शाळेतच औषधी गोळ्या देण्यात आल्या होत्या़ पण, रविराजला स्थानिक व्यवस्थापक आणि मुख्याध्यापक यांनी दवाखान्यात नेले नाही़ शुक्रवारी सकाळी मुख्याध्यापक अनिल मंडाळे यांच्या म्हणण्यानुसार त्याने फक्त दूध पिले होते असे सांगण्यात आले़ सकाळी ११ वाजेच्या सुमारास रविराजची तब्येत बिघडली असता त्याला ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले़ पण, तोपर्यंत रविराजचा मृत्यू झाला होता़ घटनेची माहिती मिळताच आदिवासी संघटनेचे पदाधिकारी, समाजबांधव, सरपंच, लोकप्रतिनिधी, यांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती़ रविराज देसाई हा साक्री तालुक्यातील खैरखुंडा गावाचा विद्यार्थी होता़ त्याच्या घरच्यांनी ग्रामीण रुग्णालयात अक्षरश: हंबरडा फोडला़ यावेळी प्रकल्प कार्यालयविरोधात आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींनी संतप्त भावना व्यक्त केल्या़ मयत विद्यार्थ्याचे नातेवाईक हे व्यवस्थापक नारायण चौधरी यांच्यावर धावून गेल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केला़ घटनेचे गांभिर्य ओळखून व्यवस्थापक यांना एका खोलीत बंद करण्यात आले़ वातावरण बिघडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ग्रामीण रुग्णालय आवारात लावण्यात आला आहे़ यावेळी विस्तार अधिकारी बी़ एम़ आव्हाड, सहायक प्रकल्प अधिकारी पी़ जे़ ठाकरे हे ग्रामीण रुग्णालयात येताच संघटनेच्या पदाधिकाºयांनी त्यांना चांगलेच धारेवर धरत रुग्णालयात शिरुच दिले नाही़ अगोदर वरिष्ठ अधिकाºयांना बोलावून संबंधित दोषी मुख्याध्यापक आणि व्यवस्थापक यांना निलंबित करा, शिक्षकही लक्ष देत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी यावेळी लावून धरण्यात आली़ याप्रसंगी आमदार डी़ एस़ अहिरे, डोंगर बागुल, गणेश गावित, तानाजी बहिरम, ईश्वर गायकवाड, किरण सोनवणे, रविंद्र मालुसरे, बाळू पवार, भरत मोरे, मन्साराम भोये, देवा सोनवणे, सभापती गणपत चौरे, रंजित गायकवाड, श्रीराम पवार, अनिल गायकवाड, डॉ़ विशाल वळवी आदी उपस्थित आहेत़
विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे पिंपळनेरात तणावाची स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 6:47 PM