शिंदखेडा : शहरात बुधवारी रात्री स्टेशन रोड परिसरात झालेल्या अपघातानंतर गुरूवारी तात्काळ तहसीलदार सुदाम महाजन यांनी कार्यालयात बैठक घेवून रहदारीच्या नियमांचे उल्लंघन करण्यांवर, दारू पिऊन वाहन चालविणा-यांवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. या बैठकीला पोलीस निरीक्षक भरत जाधव, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. या संदर्भात कारवाईचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आले.शिंदखेडा शहरातील स्टेशन रोड परिसरात दारू प्यालेल्या इसमाने मोटर सायकलने सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांना जोरदार धडक दिल्याने त्यातील सामाजिक कार्यकर्ते आर.आर.पाटील यांचा मृत्यू झाला. बुधवारी ही घटना घडली. यासारख्या घटना पुन्हा घडू नये यासाठी गुरूवार २१ रोजी तहसीलदार सुदाम महाजन यांनी खबरदारीचे उपाय राबविण्यासाठी व रहदारीच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी तातडीने ही बैठक घेण्यात आली.या बैठकीत नागरिकांनी स्टेशनरोड, विरदेलरोड, शिरपूररोडकडे फिरायला जावू नये. कॉलनी परिसरात असलेल्या खुल्या जागेत अथवा शाळेच्या किंवा महाविद्यालयांच्या मोकळया जागेत फिरायला जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.शहरात अल्पवयीन म्हणजे १८ वर्षाखालील दुचाकी अथवा चारचाकी वाहनधारकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल. पालकांनी देखील आपल्या अल्पवयीन पाल्यांना वाहन चालविण्यासाठी देवू नये, असे आवाहन करण्यात आले. तसे आढळल्यास मुलासह पालकांवर देखील कारवाई करण्यात येईल. याबाबत कोणताही दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांची देखील पोलीस डायरीत नोंद घेण्यात येऊन कारवाई करण्यात येईल. ज्या वाहनांवर नंबर प्लेट नाही किंवा फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहनांवर तात्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. ग्रामीण रूग्णालयाजवळील असलेला एस.टी. बसेसचा थांबा त्या ठिकाणाहून काढून स्टेट बॅकेजवळ देण्याबाबत तात्काळ कार्यवाहीसाठी येथील आगारप्रमुखांना आदेश दिले.या बैठकीत ग्रामीण रूग्णालयात असलेल्या असुविधांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. ग्रामीण रूग्णालयात डॉक्टर नसणे, आॅक्सिजनची सुविधा नसणे, प्राथमिक सुविधा नाही अशा प्रकारच्या ग्रामीण रूग्णालयातील असुविधांसाठी जबाबदार असणा-यांवर कारवाईचे संकेत तहसीलदार सुदाम महाजन यांनी या बैठकीत दिले.
नियम उल्लंघनासह मद्यपी चालकांवर कठोर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 10:46 PM