लोकमत आॅनलाईन धुळे - पक्षातील निष्ठावंतांना डावलून अन्य पक्षातील गुंडांना पक्षात प्रवेश दिला जात असल्याच्या आरोपात तथ्य नाही. निष्ठावंतांचे नाव पुढे करून केवळ स्वत:साठी चाललेली ही धडपड असून त्यासाठी पक्षनेत्यांवर आगपाखड केली जात आहे, अशा शब्दांत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी आमदार अनिल गोटे यांचा नामोल्लेख टाळून टीका केली. पक्षाची बदनामी आमच्यामुळे नाही, तर त्यांच्या आदळआपटमुळेच होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात गुंडांना प्रवेश दिला जात असून आपल्यासह निष्ठावंतांना डावलले जात असल्याचा आमदार अनिल गोटे यांचा आरोप असून त्यांच्याकडून आमदारकीचा राजीनामा देण्याचे जाहीर करून स्वपक्षीयांवर टीका केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉ.भामरे यांनी शुक्रवारी सकाळी राम पॅलेस येथे पत्र परिषदेत स्वत:सह पक्षाची बाजू मांडली. यावेळी महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल, सरचिटणीस हिरामण गवळी आदी उपस्थित होते. शहराचा विकास करायचा तर पक्षाकडे महापालिकेची सत्ता हवी. आणि त्यासाठी निष्ठावंत निवडून येऊ शकत नसतील तर तेथे इलेक्टीव्ह मेरिटच्या आधारावर पक्षवाढीसाठी बाहेरच्या उमेदवारांना पक्षात घ्यावेच लागते. पक्षातील निष्ठावंतांना राज्यसभा, स्वीकृत सदस्य म्हणून संधी देता येऊ शकते़ धुळे मनपासाठीही पक्षाच्या याच सूचना आहे. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू आहे, असेही ते म्हणाले. मला जातीमुळे नव्हे तर सर्व्हेतील कौलानुसार उमेदवारी मिळाली. मी गेली ३० वर्षे प्रामाणिकपणे वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून जनतेची सेवा केली. पक्षाने मतदारसंघात सर्व्हे केला तेव्हा जनतेने त्यांचा कौल दिला. त्यानुसार पक्षाने मला बोलवून तिकीट दिले. भाजपात जातीवाद नाही. म्हणूनच नरेंद्र मोदी पंतप्रधान व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकले. मी जिल्हा विकासासाठी राजकारणात आलो. ते काम मी प्रामाणिकपणे करत असल्याचेही डॉ.भामरे यांनी नमूद केले. मी निवडून गेल्यानंतर तपास केला तोपर्यंत मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाबाबत काहीच झाले नसल्याचे माझ्या लक्षात आले. त्यानंतर मी पाठपुरावा करून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, जहाज मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून हा रेल्वे मार्ग मंजूर केला. त्यासाठी निधीची तरतूद झाली. पहिल्या टप्प्यात धुळे-नरडाणा या मार्गाचे काम होत असून उर्वरीत मार्गासाठी लवकरच भूसंपादन सुरू होईल. पूर्वी मी रेल्वे आणली म्हणून त्यांना सांगता येत होते. परंतु स्वत: गडकरी यांनीच माध्यमांसमोर मी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला़ त्यामुळे त्याबाबत आता काही सांगताच येणार नाही, म्हणून मग आता रेल्वे होणार नाही, असे ते सांगतात. पण या आंधळ्या टीकेमुळे मुख्यमंत्री, जहाज वाहतूक मंत्र्यांना आपण खोटे ठरवत आहोत, हे ते विसरतात, असेही डॉ.भामरे यांनी आमदार गोटेंचा नामोल्लेख टाळून स्पष्टपणे सांगितले. त्याचप्रमाणे सुलवाडे-जामफळ योजना, अक्कलपाडा प्रकल्प, महामार्ग चौपदरीकरणासाठी केलेले प्रयत्नांचाही डॉ़ भामरे यांनी संदर्भ दिला़ जनतेने चुकीच्या प्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले़ गुंडापेक्षा यांच्यावर मोठा गुन्हा गुंडगिरीचा निकष लावायचा तर पक्षात कोणत्या गुंडांना प्रवेश दिला. जे नुकतेच पक्षात आले त्यांच्यापेक्षा मोठा तेलगीला सहकार्य केल्याचा गुन्हा यांच्यावर आहे. चार वर्षे तुरुंगात राहून ते निर्दोष नव्हे तर जामिनावर सुटले आहेत. तरीही पक्षाने त्यांना प्रवेश देऊन पंतप्र्रधान नरेंद्र मोदींच्या लाटेवर निवडून आणले, असे डॉ.भामरे यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच मला केंद्रीय नगरसेवक म्हणणारे स्वत:च नगरसेवक पदासाठी उभे राहत असल्याचेही त्यांनी सांगितले.