दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी होते. खरिपाचे अपेक्षित उत्पन्न आले नाही. ज्या गावांची खरिपाची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी होती तेथे प्रशासनातर्फे दुष्काळ जाहीर केला होता. त्यात धुळे, शिंदखेडा व साक्री तालुक्यातील काही मंडळांचा दुष्काळात समावेश करण्यात आला होता. दुष्काळग्रस्त गावातील सर्व माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुटीतही पोषण आहार देण्यात आला होता. पहिली ते आठवीपर्यंतच्या जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांना सरासरी ४० दिवस याचा लाभ देण्यात आला होता. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना १००, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दररोज १५० ग्रॅम आहार मिळत होता.
मात्र, गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस आहे. त्यामुळे दुष्काळसदृश स्थिती कुठेही नाही. असे असले तरी गेल्या वर्षी उन्हाळी सुटीतील पोषण आहाराचे जूनमध्ये वाटप करण्यात आले आहे.
मात्र, यावर्षी उन्हाळ्याच्या सुटीत पोषण आहाराचे काहीच नियोजन नाही, अथवा आदेश नाही. मे महिना संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पोषण आहाराबाबत जसे आदेश येतील तशी कार्यवाही केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.