लोकमत आॅनलाईनजैताणे : साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरात जैताणे, निजामपूरपासून ७ किमी अंतरावर असलेल्या सुमारे २ हजार लोकसंख्येच्या उभरांडी गावातील शेकडो विद्यार्र्थ्यांनी निजामपूर, जैताणे येथून लवकर निघून जाणारी बस आज दुपारपासून अडवून धरली आहे. जोपर्यंत कोणी जबाबदार अधिकारी येत नाही, तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार या विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी व्यक्त केला. उभरांडी येथून रोज शेकडो विद्यार्थी निजामपूर,जैताणे येथे शिक्षणसाठी ये जा करतात. ‘गाव तिथे एस टी बस’ असे बिरुद मिरवणाºया परिवहन महामंडळाची बस येथे अनेक निवेदने, आंदोलनांनतर सुरु झाली. मात्र ही बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांना पायीच जावे लागते. शाळा सुटण्याच्या वेळेआधीच बस निजामपूर, जैताणे येथून निघून येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अध्यार्तूनच शाळा सोडावी लागते अन्यथा पायीच घरी परतावे लागते. अनेक दिवस पाठपुरावा करूनही समस्या सुटत नसल्याने आज अखेर विद्यार्थी व ग्रामस्थांचा संयम सुटला. त्यांनी आज उभरांंडी येथे आलेली बस दुपारी १ वाजेपासून रोखून धरली. कोणी जबाबदार अधिकारी येत नाही तोपर्यत बस जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला असून अडीच तासापासून शाळा बुडवून विद्यार्थ्यांनी बसजवळच ठिय्या दिला आहे. उभरांडी येथे चौथीपर्यंत जिल्हा परिषद शाळेची सुविधा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना ७ किमी अंतरावर असलेल्या जैताणे, निजामपूर येथे जावे लागते. दैनंदिन व्यवहारासाठी ग्रामस्थही निजामपूर जैताणे येथे जातात. शेकडो विद्यार्थी ५ वि ते १२वी पर्यंत शाळेसाठी ये जा करतात. उच्च माध्यमिक विद्यालयाची वेळ सकाळी ७ ते दुपारी १२ अशी आहे. सकाळी बस उपलब्ध नसल्याने हे विद्यार्थी खाजगी वाहनाने जातात.. पाचवी ते १०वीपर्यंतची शाळा १२ पासून ५.३० पर्यंत असते. बस उभरांडी येथेच १२.३० ते १ वाजता पोहचते. परिणामी विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहचायचे असेल तर पायी किंवा खाजगी वाहन पकडून जावे लागते. बसची प्रतीक्षा केली तर सुरुवातीच्या तीन-चार तासिका बुडतात. सायंकाळी ४.३० वाजताच ही बस निजामपूर येथून उभरांडीकडे रवाना होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा सुटण्याच्या आतच बसकडे धाव घ्यावी लागते. नववी-दहावीत असणाºया विद्यार्थ्यांना मात्र शाळा सुटेपर्यंत थांबावे लागते. त्यांना सायंकाळी निजामपूर येथून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत उभरंडी येथे पोहचावे लागते. निर्जन रस्ता, डोक्याएवढ्या मुलींना जीव मुठीत घेऊन घरी यावे लागते. पाल्य घरी परतेपर्यंत पालकांचा जिवात जीव नसतो. या सर्व पार्श्वभूमीवर पालकांनी वेळोवेळी सरपंच सावळे व जि.प.शाळेचे शिक्षक प्रकाश बच्छाव यांच्या मदतीने साक्री आगारप्रमुखाना निवेदन दिले, विनंती केली. मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.आज मात्र त्यांच्या संयमाचा बांध फुटला. गावात बस पोहचताच ग्रामस्थांनी ती अडवून जबाबदार अधिकारी येत नाही तोपर्यंत बस जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला. दरम्यान बससाठी तिष्ठत बसल्याने ते शाळेत पोहचू न शकल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. साक्री आगरप्रमुख देवरे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी बस उशीर होण्याचे कारण ब्रेकडाऊन असल्याचे सांगून दररोज बस वेळेवर जाते, असे स्पष्ट केले. सायंकाळच्या फेरीची वेळ बदलण्यासाठी वैयक्तिक लक्ष देऊ, असेही ते म्हणाले. दुपारी ३ वाजता आपण स्वत: उभरांडी येथे जाणार असल्याचेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. बस दुपारी ४ वाजेपर्यंत उभरांडी येथेच थांबलेली होती. या सर्व समस्यांवर समाधानकारक तोडगा न निघाल्यास गावात एस.टी.बस येऊ देणार नाही व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जनआंदोलन केले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.