धुळे : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सत्तेत आली तर देशातील सर्व गरीब नागरिकांना किमान उत्पन्नाएवढी रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल, अशी घोषणा काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष राहूल गांधी यांनी जाहीर सभेत केली.एस.एस.व्ही.पी.एस.महाविद्यालयाच्या मैदानावर शुक्रवारी दुपारी झालेल्या सभेला नाशिक, नंदुरबार, जळगाव व धुळे जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.काँग्रेसचे महाराष्टÑ प्रभारी खासदार मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण व विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी सभेला उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र असलेल्या २५ उद्योगपतींचा भारत एकीकडे तर सामान्य शेतकरी, बेरोजगारांचा भारत दुसरीकडे आहे. काँग्रेसला एकसंघ भारत हवा आहे. आश्वासनाची अंमलबजावणी हा काँग्रेसचा इतिहास आहे. हरितक्रांती, श्वेतक्रांती, माहिती-तंत्रज्ञान क्रांती, आधार, शालेय पोषण आहार, माहितीचा अधिकार अशी महत्त्वाकांक्षी कामे काँग्रेसने केली आहे. आता आम्ही देशाच्या उत्पन्नाचा फायदा सर्वांना देऊ. त्यात सर्वांना भागिदार करु. आम्ही देशातील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करुन देऊ. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानात सत्ता येताच आश्वासनाची पूर्ती करीत आमच्या मुख्यमंत्र्यांनी अवध्या दोन दिवसांत कर्जमाफी लागू केली, याची आठवण राहुल गांधी यांनी करुन दिली.काँग्रेसची विचारधारा देशाला आणि समाजाला जोडण्याची आहे. ही विचारधारा महाराष्टÑात सर्वात जास्त आहे. काँग्रेसची सुरुवात महाराष्टÑातूनच झाली आहे. त्यामुळे महाराष्टÑाच्या जनतेचे आभार मानतो. आम्ही राज्यात राष्टÑवादीसोबत लोकसभा निवडणूक लढवित आहोत, असेही खासदार राहूल गांधी म्हणाले.
गरिबाच्या किमान उत्त्पन्नाइतकी रक्कम बँक खात्यात जमा करु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 5:59 PM