महापालिकेचा अॅक्शन प्लॅन
कोरोना असूनही शहरात फिरणाऱ्यांची संख्या काही करूनही कमी होताना दिसून येत नाही़ त्यांना रोखण्यासाठी सध्या प्रशासनाकडे कोणत्याही प्रकारचा अॅक्शन प्लॅन नसल्याची वस्तुस्थिती समोर आल्याने ही बाब गांभीर्याने घेण्यात आली आहे़ गर्दीच्या ठिकाणी जाऊन विनाकारण फिरणाऱ्यांना पकडून त्यांची कोरोना चाचणी घेण्याची विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे़ शुक्रवारी या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी सुमारे २७५ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली़ त्यात २१ पॉझिटिव्ह आढळून आले़ तत्काळ त्यांना पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले़ शनिवारी सुमारे १२५ जणांची तपासणी करण्यात आली़ त्यात कोणीही पॉझिटिव्ह आढळून आलेले नाही़
विनाकारण वाढतोय वावर
शहरात संचारबंदी लावूनही विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे वर्दळीवरून समोर येत आहे़ कोरोनाच्या अनुषंगाने लॉकडाऊन असतानाही बिनधास्तपणे फिरणाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही़ पोलीसदेखील ठरावीक ठिकाणी आणि ठरावीक वेळेतच दिसत असल्याने बहुधा त्याचा फायदा अनेकांकडून घेतला जात असल्याचे स्पष्ट आहे़ दिवसांप्रमाणे रात्रीदेखील फिरणारे दिसून येत असल्याने शहरातील प्रमुख चौकांमध्ये बॅरिकेट्स लावून विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांकडून अडविण्यात येत आहे़
पोलिसांकडूनही चौकशी
देवपुराकडून शहराकडे येणाऱ्या लहान पुलानजीक स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याजवळ देवपूर पोलिसांकडून सकाळी वाहनांची तपासणी करण्याचे काम सुरू झाले आहे़ शहरातील संतोषी माता चौक, आग्रा रोड, पाच कंदील, लोकमान्य हॉस्पिटलचा परिसर, पारोळा रोड, साक्री रोड, दत्त मंदिर यासह विविध वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय करण्यात आले़