पिंपळनेर : गुजरात राज्यात ऊसतोडीसाठी गेलेले तालुक्यातील ४५० मजूर पहाटे दाखल झाले आहेत. या सर्व मजुरांची तपासणी ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य रुग्णालयाच्या माध्यमातून करण्यात आली. तसेच त्यांच्या हातावर होम क्वॉरंटाईनचा शिक्का मारून त्यांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घरी पाठविण्यात आले.साक्री तालुक्यातील गुजरात राज्यामध्ये ऊसतोडीसाठी गेलेले आदिवासी मजूर आता दररोज परतू लागले आहेत. गेल्या दोन दिवसापूर्वी सायन साखर कारखान्याचे ९६ मजूर व त्यांच्यासोबत असलेले ३५ ते ४० लहान मुले-मुली असे दाखल झाले होते. या सर्वांना होम क्वॉरंटाईनचा शिक्का हातावर मारून त्यांच्या घरी पाठविण्यात आले होते. तर त्याच सायन साखर कारखान्यातील ९८ मजुरांसह मुले पिंपळनेरसह परिसरातील गावांचे मजूर आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास दाखल झाले आहेत.यात पिंपळनेर बोरबंद भिल वस्तीतील १६, काकासट भिल वस्तीतील २८, रोहन ता.साक्री ३४, शेलबारी ता.साक्री ८, रायकोट ६, सडगाव ता.धुळे ४ आदी गावांचे मजूर दाखल झाले आहेत, रोहन येथील ऊस तोड मजूर पहाटे ३ वाजता गावाबाहेर वाहनाने आणून सोडण्यात आले. तर रविवारी पहाटे मोठ्या संख्येने ऊसतोड मजूर गुजरात राज्यातून आले आहेत. यात पिंपळनेर येथील २३०, सामोडे ७०, सुकापूर ४६, विरखेल १० असे मजूर दाखल झाले आहेत. ग्रामीण रुग्णालय तसेच स्थानिक प्राथमिक उपकेंद्राच्या डॉक्टरांकडून सर्व मजुरांची तपासणी करण्यात आली आहे. सर्व मजूरांना होम क्वॉरंटाईनचा शिक्का मारून घरी पाठविण्यात आले आहे. सर्व मजूर हे सायन कारखान्यातील असल्याचे पत्र त्यांच्याकडे होते. परत येणाऱ्या ऊसतोड मजुरांची संख्या वाढत असल्याने येथील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांवर कामाचा ताण वाढलेला आहे.नेर परिसरातही ४०० मजूर आलेनेर- लॉकडाऊन अजून वाढविण्यात आल्याने गुजरात राज्यात अडकलेल्या ऊसतोड मजुरांना विविध वाहनांद्वारे आणणे सुरु आहे. सुरत-नागपुर महामार्गावर वाहनांची संख्या वाढली. मजुरांना घेऊन जात असतांना ही वाहने सुसाट वेगाने जात असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे महामार्गावरील पोलीसांनी अशा वाहन चालकांना तंबी द्यावी, अशी मागणी नेर येथील ग्रामस्थांनी केली. धुळे तालुक्यातील नेर येथे लोणखेडी फाट्याजवळील मैदानात पाच ते सहा माल वाहतूक करणाºया वाहनात पहाटे चार वाजता विविध आदिवासी वस्तीतील सुमारे ४०० ऊसतोड कामगार आपल्या परिवारासह परतले. सकाळी सहा वाजता गावातील सामाजिक कार्यकर्ते झिपा नाईक यांनी नेरचे सरपंच शंकरराव खलाणे यांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ दखल घेत प्राथमिक आरोग्य केंद्र, कोरोना वॉरियर्स, पोलीस पाटील यांना ऊसतोड कामगारासंदर्भात माहिती दिली. लोणखेडी फाटयाजवळ जाऊन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी सर्वांची तपासणी करून हातावर १४ दिवसासाठी होम क्वॉरंटाईन करण्यात आल्याचा शिक्का मारला. घरीच राहण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. सरपंचांनी मास्क, सॅनिटायझर वाटप केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य देविदास माळी, कोतवाल नाना कोळी, कोरोना वॉरियर्स संतोष ईशी, जितेंद्र देवरे, दिपक अहिरे, राकेश अहिरे, प्रमोद निकुंभे, दिपक खलाणे, सुरज खलाणे, उमाकांत खलाणे, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस पाटील आदी उपस्थित होते.
पिंपळनेर, नेर परिसरात गुजरात राज्यातून ऊसतोड मजूर परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2020 12:32 PM