लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : तालुक्यातील तामथरे येथील तरुण शेतकरी भूषण शालीग्राम चौधरी (२८) याने स्वत:च्या शेतातील निंबाच्या झाडाला कर्जबाजारी व नापिकीमुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार ११ रोजी रात्री घडली.भूषण चौधरी यांची गावशिवारात शेत जमीन असून तेथेच त्यांनी छोटेसे शेड बांधून गाई ठेवल्या आहेत. शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास गाईंची राखण करण्यासाठी शेतात भूषण, त्याचा लहान भाऊ महेंद्र, चुलत भाऊ संदीप व नितीन चौधरी असे चौघेजण शेतात झोपण्यासाठी गेले. सकाळी गाईच्या हंबरण्याच्या आवाजाने सर्वांना जाग आली. त्यावेळी त्यांना भूषण दिसला नाही. म्हणून चुलत भाऊ नितीन याने समोर परिसरात जाऊन पाहिले असता शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे दिसले. त्यांनी घाबरून आरडाओरड करून मोबाईलद्वारे गावात माहिती दिली.भूषण यास शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई, वडील, एक लहान भाऊ असून एक महिन्याची मुलगी आहे. पत्नी बाळंतपणासाठी महाळपूर, ता पारोळा येथे गेली होती. भूषणची आई नातीला बघण्यासाठीच गेली होती.भूषणच्या वडिलांच्या नावे ४ एकर शेतजमीन असून या वर्षी कापूस लागवड केली. पाऊस नसल्याने अपेक्षित उत्पन्न न आल्याने देणेकºयांची देणी व चिमठाणे बँकेचे ७० हजारांचे पीक कर्ज कसे फेडावे, अशी विवंचना त्यास लागली होती. त्यातूनच त्याने आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे. भूषण हा घरातील कर्ता असल्याने त्यांच्या कुटुंबावर या घटनेमुळे दु:खाचा डोंगर कोसळला असून शनिवारी दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चिमठाणे पोलीस दूरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 11:34 AM