भिका पाटील । शिंदखेडा : नोकरी न करता स्वत:चा व्यवसाय उभा करून नवउद्योजक म्हणून उदयास आलेले शरद पाटील यांनी दीड वर्षांपूर्वी सुरू केलेला सॅनेटरी नॅपकीनचा व्यवसाय इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. मोठ्या कंपनीतील नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय उभारावा, हा विचार त्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणला. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाबद्दल अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे.शिंदखेडा येथील गर्ल्स हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक गुलाबराव पाटील यांचे लहान चिरंजीव शरद पाटील यांनी आपले संगणकशास्र पदवीचे शिक्षण पूर्ण करून सोलापूर येथील नामांकित कंपनी युरेका फोर्ब्समध्ये फेब्रुवारी १९९२ मध्ये सुरवातीलाच १५ हजार रुपयांच्या पगारावर १७ महिने काम केले. मात्र त्यांना नोकरी करण्यात स्वारस्य नसल्याने व आपण व्यापार वा छोटा-मोठा स्वत:चा उद्योेग उभारावा म्हणून ते नोकरी सोडून जून ११९३ मध्ये शिंदखेड्यात परत आले. त्यानंतर उद्योगासाठी मोठे भांडवल पाहिजे ते नसल्याने त्यांनी १९९५ मध्ये त्रिमूर्ती पान मसालाचे दुकान सुरू केले. ते त्यांनी २२ वर्ष चालवले. मात्र शासनाने गुटखाबंदी केल्याने त्यांनी तो व्यवसायही स्वत:च बंद केला. आणि त्यांनी २०१७ पासून सॅनेटरी नॅपकीनचा स्वत:चा व्यवसाय सुरू केला. त्यात ते ‘बेला’ या नावा (ब्रॅँडनेम)ने विविध तीन प्रकाराचे नॅपकीन बनवतात. त्यात सर्व व्यवसाय म्हणजे आॅर्डर ते डिलिव्हरी ही सर्व आॅनलाईनने करतात. त्यात त्यांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असून देशभर त्यांचे नॅपकीन पाठविले जात आहेत. त्यांनी त्या बरोबर बेला सॅनेटरी नॅपकीन वेंडीग मशीनचीही निर्मिती केली. हे मशीन त्यांनी अल्प नफ्यात विद्यर्थिनींनीसाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये बसवले आहे. त्यात पाच रुपयांचे नाणे टाकले की नॅपकीन मिळत असल्याने त्यासही चांगला प्रतिसाद लाभत आहे. त्यांच्या या कार्यामुळे शिंदखेडा व परिसरात ‘पॅड मॅन’ म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. उत्पादक सध्या नॅपकीन त्यांना पाहिजे त्या स्वरूपात कराराने बनवून घेत आहेत. येत्या सहा महिन्यात ते यासाठी शहरात मशिनरी आणून उद्योग उभारणी करणार आहेत. सॅनेटरी नॅपकीन हा नैसर्गिक स्वरूपात व शेतीतून पिकणाºया केळीच्या वाया गेलेल्या खोडापासून बनवणार असून त्यासाठी त्यांनी कामही सुरू केले आहे. या मुळे अनेकांना रोजगार मिळणार असून वाया जाणारे केळीचे खांब (खोड)ही कामात येणार असल्याने शेतकºयांनाही याचा फायदा होईल. तसेच त्यांना आर्थिक लाभही होणार आहे.
संडे स्पेशल... शिंदखेड्यात ‘पॅड मॅन’ व्यावसायिक ठरला प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 12:02 PM