धुळे : कोरोना विषाणू संसर्गास घाबरुन जिथे रक्ताचे नातेवाईक व जातीचे कुणीही साथ देण्यास पुढे आले नाही, अशावेळी परधर्माच्या युवकांनी माणुसकीची जाण ठेवून केलेल्या कार्याला पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत त्या युवकांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली़ पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांना बोलावून त्यांचा सन्मान देखील केला़९ मे रोजी धुळे शहरातील एका महिलेला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने ती मयत झाली होती़ या महिलेचे जवळचे नातेवाईक अंत्यविधीसाठी पुढे आले नाहीत़ त्यावेळी त्याच परिसरात राहणारे मुस्लिम युवक रईस हिंदुस्थानी, मसूद अहमद शब्बीर अहमद अन्सारी, अबु इकबाल अहमद अन्सारी, अबरार अहमद अन्सारी, अब्दुल नसीब अन्सारी, इम्रान अहमद अन्सारी, निहाल अहमद अन्सारी, फजलु रहेमान अन्सारी आणि रुग्णवाहिकेचा चालक अबुहरेरा अन्सारी यांनी स्वत: पुढाकार घेऊन कोरोना विषाणूबाबत सुरक्षेच्या दृष्टीने दक्षता घेवून सदर मयत महिलेच्या मुलाच्या खांद्याला खांदा लावून पुढाकार घेतला होता़ त्यानंतर हिंदू धार्मिक पध्दतीने अंत्यसंस्कार देखील पार पाडले़ या त्यांच्या कृतीतून त्यांनी हिंदू - मुस्लिम एकता आणि माणुसकी यांचे एक आदर्श उदाहरण समाजापुढे ठेवले आहे़रमजान ईद सारख्या पवित्र सणाच्या दिवशी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ आणि अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी या युवकांच्या कार्याची दखल घेतली़ सोमवारी त्यांचा सन्मान केल्याने मदत करणारे युवक भारावून गेले होते़ प्रत्येकाला एक सन्मानपत्र देखील यावेळी देण्यात आले़ यावेळी जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, हेड कॉन्स्टेबल मिलींद सोनवणे, संजय पाटील यांच्यासह अन्य पोलीस उपस्थित होते़दरम्यान, रमजानसारख्या पवित्र महिन्यात जात-धर्म बाजूला ठेवून आम्ही केवळ माणूस म्हणून कर्तव्य केले़ परंतु त्यास जिल्हा पोलीस दलाकडून देण्यात आलेल्या कौतुकाच्या थापेमुळे यापुढे अशीच समाजसेवा करण्याकरीता मोठी प्रेरणा मिळाली, अशी भावना यावेळी सन्मानित झालेल्या युवकांनी बोलून दाखविली़ हिंदू-मुस्लिम एकतेकरीता आणि माणुसकीच्या रक्षणाकरीता भविष्यातही असेच कार्यरत राहू असा निर्धार या युवकांनी व्यक्त केला़
मुस्लिम युवकांच्या कार्याची पोलीस अधीक्षकांकडून दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 8:50 PM