वडजाई,दि.18- धुळे तालुक्यातील वडजाई येथे धरणातील गढुळ पाणी पिण्यासाठी सोडण्यात येत असल्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे डायरीयासह साथीच्या आजारांचा फैलाव होण्याची शक्यता निर्माण झाली असून पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
वडजाई येथे तीव्र पाणीटंचाई आहे. गावाला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मार्च महिन्यार्पयत गावातील पाणीपुरवठा करणा:या विहिरीवरुन पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतू त्या विहिरीची पाण्याची पातळी खालावल्यामुळे गावाला पाणी पुरविणे शक्य नाही. ग्रामपंचायतीने गेल्यावर्षी फागणे शिवारातील धरणामध्ये शेवडी योजनेतून शेवडी खोदली होती. त्यातून गावाला पाणीपुरवठा केला होता. यावर्षी एप्रिल महिन्यातच पाणीटंचाई जाणवू लागल्यामुळे ग्रामपंचायतीने सरळ धरणात पाईप टाकून धरणाचे गढुळ पाणी करणा:या विहीरीत टाकून ते पाणी गावात पिण्यासाठी सोडण्यात येत आहे. या पाण्यात ब्लिचींग पावडर टाकण्यात येत नाही, स्वच्छ पाण्यासाठी उपाययोजना नाही, सरळ गढुळ पाणी पिण्यासाठी सोडण्यात येत आहे. हे धरणाचे तुंबलेले पाणी आहे, त्यात गुरे, बैल, म्हैस धुतले जात असत, हे घाण पाणी सोडले जात असल्यामुळे गावात साथीच्या आजाराची लागण होण्याची शक्यता बळावली आहे.