जळगाव,दि.9- यापुढे विधानसभा निवडणूक लढविणार नाही, या माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या विधानाचे संपूर्ण जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. सुरेशदादांनी लोकसभा, राज्यसभा, विधानपरिषदेचे पर्याय खुले ठेवले असले तरीही विधानसभेचाही पर्याय खुला ठेवावा, या मागणीसाठी विविध संस्था, संघटना, मंडळांचे पदाधिकारी व कार्यकत्र्यानी 7, शिवाजीनगर या त्यांच्या निवासस्थानी साकडे घातले.
बहिणाबाई उद्यानाच्या सुशोभीकरण कार्यक्रमात रविवारी सुरेशदादा जैन यांनी ‘मी 9 वेळा शहराचा आमदार राहिलो आहे, यादरम्यान जळगावकरांनी भरपूर प्रेम दिले. भविष्यात मी विधानसभेची निवडणूक लढविणार नाही.’ असे विधान केले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित भाजपाचे आमदार सुरेश भोळे यांना उद्देशून ते म्हणाले, की मी विधाननसभा निवडणूक लढविणार नसल्याने तुम्ही भीती बाळगण्याचे कारण नाही.
सुरेशदादांच्या या विधानाचे पडसाद जिल्ह्याच्या राजकारणात उमटले आहेत. सुरेशदादांनी केवळ विधानसभेची निवडणूक लढविणार नाही, असे वक्तव्य केलेले असून लोकसभा, विधानपरिषद, राज्यसभेचा पर्याय खुला ठेवला आहे. मात्र सुरेशदादांनी विधानसभेचाही पर्याय खुला ठेवावा, यासाठी जळगावातील विविध स्तरातील नागरिक, व्यापारी, बांधकाम व्यावसायिक, उद्योजक यांच्या संघटना तसेच कार्यकत्र्याची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन साकडे घालण्यासाठी रीघ लागली आहे.सुरेशदादा जैन हे प्रत्येक शिष्टमंडळाची भेट घेत असून त्यांचे म्हणणे ऐकून घेत आहे.
राजकीय संन्यासाचा प्रश्नच नाही-सुरेशदादा
मी विधानसभा निवडणूक लढविणार नाही, असे जाहीरपणे बोललो, मात्र राजकीय संन्यास घेण्याविषयी बोललो नाही. नजिकच्या काळात कोणतीही निवडणूक नसल्याने समाजकारण व राजकारण सुरूच राहणार असल्याची स्पष्टोक्ती माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.
घरकूल प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर समाजकारणात सक्रीय राहणार असल्याचे सुरेशदादांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार 8 महिन्यांपासून ते जळगावसह राज्यभर सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सक्रीय सहभागी आहेत. रविवारच्या विधानानंतर राजकीय क्षेत्रात गदारोळ उडाला. या पाश्र्वभूमीवर सुरेशदादा जैन यांची भेट घेतली. अतीशय प्रसन्न मूडमध्ये असलेल्या सुरेशदादा जैन यांनी रविवारच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले, मी 9 वेळा शहराचा आमदार राहिलो. जळगावकरांनी भरभरून प्रेम दिले. त्यामुळे आता विधानसभा निवडणूक लढविणार नाही. मात्र लोकसभा, विधान परिषद, राज्यसभेचा पर्याय खुला आहे. सध्या कोणतीही निवडणूक नसल्याने त्याबाबत विचार केलेला नाही. तसेच लोकसभेची निवडणूक एकदा लढविली देखील आहे. देशपातळीवर काम करण्याची इच्छा आधीपासूनच आहे. मात्र कार्यकत्र्याकडून विधानसभेचा पर्यायही खुला ठेवा, असा आग्रह सुरू झाला आहे. कालपासून वेगवेगळ्या समाजातील, स्तरातील लोक याबाबत भेटण्यासाठी येत आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीला 2 वर्ष तर विधानसभा निवडणुकीला अडीच वर्षाचा कालावधी आहे. त्यामुळे आता त्याबाबत विचार करणे घाईचे ठरेल. राजकीय संन्यास, भाजपाच्या वाटेवर अशा सुरु झालेल्या चर्चेविषयी बोलतांना सुरेशदादा जैन म्हणाले की, माङया विधानाचा वेगवेगळा अर्थ काढला जात आहे. राजकीय संन्यासाविषयी मी काहीही बोललो नाही. ‘मी शिवसेनेत आहे. पक्ष बदलाचा विचार नाही. प्रसारमाध्यमांमध्ये सुरु असलेल्या चर्चाचा मीदेखील आनंद घेत आहे.