दोंडाईचा : कामावर जाणाऱ्या मोहन मराठे याला बुधवारी सकाळी एका प्रकरणात संशयित म्हणून दोंडाईचा पोलिसांनी ताब्यात घेतले़ वैद्यकीय तपासणी करुन त्याला सोडून दिले असे पोलिसांचे म्हणणे आहे़ पण, त्याच तरुणाचा मृतदेह रात्री शहादा रस्त्यावर पीर टेकडीजवळ आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे़ तरुणाच्या संशयास्पद मृत्यूमुळे दोंडाईचा पोलीस चौकशीच्या जाळ्यात अडकले आहे. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी दिली़ यानिमित्ताने दोंडाईचा येथे झालेल्या योगेश धनगर खून प्रकरणाची आठवण दोंडाईचाकरांना झाली.दोंडाईचा शहातील संत कबीर नगरात राहणाºया मोहन सदाशिव मराठे (३७) या तरुणाला बुधवार ७ आॅक्टोबर रोजी सकाळी दोंडाईचा पोलिसांनी एका प्रकरणात संशयित म्हणून ताब्यात घेतले होते़ तो नेहमीप्रमाणे एका कामावर जात असताना त्याला ताब्यात घेवून पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणले़ ही घटना त्याच्या आईला कळताच तिने गावातील सामाजिक कार्यकर्ते विजू मराठे यांना सोबत घेऊन पोलीस ठाणे गाठले़ दोंडाईचा पोलिसांना मोहन मराठे याच्याबद्दल विचारणा केली असता त्यांनी या तरुणाला वैद्यकीय तपासणी करण्याकरीता नेले असल्याचे सांगितले़ त्यानंतर थोड्याच कालावधीत शहादा रस्त्यावर असलेल्या पीर टेकडीजवळ मोहन या तरुणाचा मृतदेह आढळून आला़ मोहनच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या आईसह नातेवाईक आणि मित्र परिवाराने घटनास्थळी धाव घेतली़ मुलाचा मृतदेह पाहून आईने तर टाहो फोडला़ मोहनच्या संशयास्पद मृत्यूमुळे दोंडाईचा शहरात तणाव निर्माण झाला़ घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड, संतोष लोले पोलिसांच्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले़ त्यांनी संतप्त जमावाला शांत केले.अनेक प्रश्न अनुतरीतपोलिसांनी मोहनला ताब्यात घेतल्यानंतर सोडून दिले होते का? तसे असेल तर त्यानंतर त्याचा अचानक मृत्यू झालाच कसा? असे प्रश्न निर्माण होत आहेत़ पोलिसांच्या ताब्यात असतानाच तर मोहनचा मृत्यू झाला नाही ना अशी देखील शंका उपस्थित होत आहे़ या घटनेनंतर या प्रकारामागे नेमका कोणाचा हात आहे, मोहनचा मृत्यू हा नैसर्गिक आहे की घातपात, अशा अनेक प्रश्नांची मालिका निर्माण झालेली आहे़
दोंडाईचा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मोहन मराठेचा संशयास्पद मृत्यू, तपास सीआयडीकडे वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 12:07 PM