लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : देवपुरातील दत्तमंदिर ते स्वामी नारायण मंदिराच्या रस्त्यावर असलेल्या शासकीय आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात एका तरुणाचा मृतदेह रविवारी रात्री संशयास्पदरित्या आढळून आला़ त्याचा कोणीतरी घातपात केला असावा असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलेला आहे़ दरम्यान, हा तरुण वसतिगृहात अनधिकृतरित्या राहत असल्याचे समोर आले आहे़ प्रजेश गुलाबसिंग पावरा (२२, रा़ खुटवाडे ता़ शहादा) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे़ प्राप्त झालेल्या माहितीनुसार प्रजेश पावरा हा पुर्वी गंगामाई फार्मसी विद्यालयात बी फार्मसीचे शिक्षण घेत होता़ त्यावेळेच्या ओळखीमुळे तो दत्तमंदिर रस्त्यावरील आदिवासी वसतिगृहात वास्तव्यास होता़ वसतिगृहात त्याच्या उपस्थितीबाबत कोणतीही नोंद नव्हती़ सोमवारी रात्री आपल्या विद्यार्थी मित्रांसोबत त्याने जेवण आटोपले़ जेवणानंतर पाणी पिण्यासाठी जात असल्याचे सांगून तो खोलीबाहेर पडला़ त्यानंतर तो परत आलाच नाही़ बºयाच वेळानंतर विद्यार्थ्यांनी शोधा-शोध केली असता इमारतीच्या खालच्या बाजूस अंधारात तो बेशुध्दावस्थेत पडलेला आढळून आला़ यावेळी प्रजेश पावरा याच्या तोंडातून रक्त वाहत होते़ त्याला काही जखमीही झाल्या होत्या़ घटनेनंतर रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास प्रजेश याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले़ पण, तत्पुर्वीच प्रजेशचा मृत्यू झाला होता़ या घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कोळी घटनास्थळी दाखल झाले़ घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आला आहे़ याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़ मृत प्रजेश पावरा याचा भाऊ सुकलालसिंग पावरा हा एसटी बसमध्ये वाहक म्हणून नोकरी करतो़ घटनेची माहिती मिळताच त्याने कुटुंबियांसह हिरे वैद्यकीय महाविद्यालय गाठले़ भावाचा कोणीतरी घातपात केला, घटनास्थळी रक्ताचे डाग होते, त्यामुळे सखोल चौकशीची मागणी केली.
धुळ्यात वसतिगृहात तरुणाचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:55 PM