लोकमत न्यूज नेटवर्ककुसुंबा : सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर धुळ्यानजीक मोराणे गावाजवळ ट्रकने उडविल्याने सायकलस्वाराचा जागीच मृत्यू ओढवल्याची घटना गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली़ घटना घडताच नागरिकांनी गतिरोधकाची मागणी लावून धरली़ यासाठी काही वेळ रास्ता रोको करीत निदर्शनेही केल्याने काही काळ महामार्गावर तणावाची स्थिती निर्माण झाली होती़ मोराणे गावातील रहिवासी राजेंद्र आनंदा सोनवणे (५२) हे सायकलने मोराणे फाट्याकडे येत असताना त्यांना ट्रकची जोरदार धडक बसली़ यात त्यांची सायकल दूरवर फेकली गेली़ यात सोनवणे हे रस्त्यावर आपटले गेले़ त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला़ रक्तबंबाळ झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू ओढवला़ अपघाताचे हे दृष्य पाहताच मोराणे गावातील ग्रामस्थ आणि महामार्गावर असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केलेली होती़ संतप्त जमावाने लागलीच रास्ता रोको आंदोलन करत वाहतूक रोखली आणि महामार्गवर गतिरोधकाची मागणी लावून धरली होती़ यामुळे काहीकाळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती़अपघाताचे वृत्त धुळे तालुका पोलिसांना कळताच मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले़ पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला़ त्यानंतर वाहतूक सुरळीत झाल्याने महामार्गावर निर्माण झालेली वाहतुकीची कोंडी मोकळी झाली़
सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत ४ ते ५ मोठ्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. मोराणे गावात प्रवेश करताना अपघाताची समस्या निर्माण होऊ शकते़ या अनुषंगाने उड्डाण पुलाची आवश्यकता असून या मागणीकडे प्रशासनाने लक्ष पाहिजे, असे मोराणे येथील प्रकाश देसले, नामदेव पाटील, यशवंत पाटील, अरुण पाटील, पीतांबर सूर्यवंशी यांनी म्हटले आहे. मयत राजेंद्र सोनवणे यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, बहिणी असा परिवार आहे़ शुक्रवारी सकाळी त्यांच्या मृतादेहावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत़