धुळे , दि.25 - शहरातील स्नेहनगर भागात मनपाने बीओटी तत्त्वावर अडीच कोटी रुपये खर्चून जलतरण तलाव उभारला आहे. संबंधित तलाव लवकरच म्हणजे 1 मेपासून सुरू केला जाणार आह़े त्यामुळे ऐन उन्हाळ्यात धुळेकरांना पोहण्याचा आनंद घेता येणार आह़े 30 वर्षासाठी हा तलाव बीओटी तत्त्वावर देण्यात आला असून तो शहरातील सर्वात मोठा जलतरण तलाव आह़े
महापालिकेने 2012 मध्येच स्नेहनगरात बीओटी तत्त्वावर जलतरण तलाव उभारण्याचा निर्णय घेतला होता़ मात्र स्नेहनगरात ड्रेनेज लाईन नसल्याने प्रस्तावित जागेत सांडपाणी साचले होत़े त्यामुळे जवळपास दीड वर्ष हे काम रखडले होत़े सातत्याने मागणी केल्यानंतर अखेर पुण्याच्या एका संस्थेकडून संपूर्ण स्नेहनगर परिसरातील सांडपाण्याची समस्या सोडविण्यात आली व तलावासाठीदेखील स्वतंत्र ड्रेनेजलाईन टाकण्यात आली़ त्याचप्रमाणे या तलावाच्या कामासाठी आवश्यक प्रक्रिया तसेच मूळ नस्ती गहाळ झाल्याने काम सुरू होण्यास बराच कालावधी लागला़ तसेच अनेकदा वादविवादही झाले होत़े अखेर स्नेहनगर तलावाचे काम दीड ते दोन वर्षापूर्वी सुरू करण्यात आले होत़े त्यानुसार हे काम पूर्णत्वास आले असून 1 मेपासून हा तलाव सुरू करण्यात येणार आह़े