धुळे: शहरातील अंबिका नगरात हातात तलवार घेऊन दहशत माजविण्याच्या उद्देशाने फिरत असलेल्या एका अल्पवयीन मुलाला तलवारीसह पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या पथकाला यश आले. ही कारवाई शनिवारी दुपारी करण्यात आली. त्याच्या विरोधात सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील अंबिका नगर परिसरात हनुमान मंदिराजवळ एक मुलगा हातात तलवार घेऊन दहशत माजविण्यााच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकाला रवाना केले. पथकाने हनुमान मंदिराजवळ सापळा लावला.
शनिवारी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १ हजार रुपये किमतीची तलवार हस्तगत करण्यात आली. याप्रकरणी पोलिस कर्मचारी योगेश साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव रोड पोलिसात शनिवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिस नाईक एन. जे. देवरे घटनेचा तपास करीत आहेत.