लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : कोरोना संसर्गाचा जिल्ह्यात वाढणारा रूग्णांचा आकडा पाहता आता कोरोनाला रोखण्यासाठी सर्वांच्याच पुढाकाराची खºया अर्थाने गरज आहे़ प्रशासन करेल, आपल्याला काय करायचे या नकारात्मक प्रवृत्तीच्या बेफिकीरांवर कठोर कारवाई करण्याची वेळ आता आली आहे़ अनेक जण स्वत: खबरदारी घेत मास्क, सॅनिटायझरचा वापर करीत आहेत़ मात्र अद्यापही कोरोना बिरोना काही नाही म्हणत स्वत:सोबत इतरांचे आरोग्यही धोक्यात आणू पाहणारेही महानग आहेत़कोरोनाबाबत भीती बाळगण्याऐवजी सावधानता बाळगली तर त्यावर नक्की मात करता येते़ हे अनेक वेळा यापूर्वी सिध्द झाले आहे़ तालुक्यात १३ रोजी दुपारपर्यंत २ हजार १४६ कोरोना बाधित रूग्ण संख्येचा आकडा ओलांडला आहे़ संक्रमण वाढत असूनही काही मंडळी मास्क न लावता बिनधास्त हिंडताना दिसतात़ खर्रासारखे, तंबाखूसारखे पदार्थ खाऊन रस्त्यावर थुंकणे, नाहक बाजारात अथवा नाक्यावर गर्दी किंवा घोळका करून गप्पा मारण्याचे प्रकार अद्याप कमी झालेले नाहीत़ काही होत नाही, या अविर्भावात कित्येक मंडळी फिरत असतात़ दुचाकीवरून डबल नाही तर ट्रीपल सीट फेरफटका मारणारे महाभागही आहेत़ यात मुलीही मागे नाहीत़कोरोनाचा तालुक्यात पहिला रूग्ण २३ एप्रिलला सापडला आणि तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला़ तेव्हापासून कोरोनाचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा, सुरक्षेसाठी पोलिस व एकूणच सर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासन कार्यरत आहे़कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शिवाय कोरोना साखळीचे संक्रमण तोडण्यासाठी सर्व यंत्रणेवर ताण येत आहे़ त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला साथ देण्याची गरज आहे़कोरोनामुळे शाळा, महाविद्यालयांचे अध्यापन आॅनलाईन पध्दतीत सुरू आहे़ शासकीय कार्यालयातही मर्यादीत संख्या ठेवून कामकाज करण्यात येत आहे़ एकूणच प्रत्येक व्यक्ती आपापली कामाची जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे, असे असतांना सामाजिक बांधिलकी म्हणूनच सोशल डिस्टन्सिंग असो, मास्क वापर असो, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळणे असो याबाबत स्वत:च स्वत:वर निर्बंध लावून घेतले तर सामाजिक कार्यात सहभागी झाल्याचे समाधान नक्कीच लाभेल़दररोज कोरोना बाधितांची संख्या वाढत असतांना मृत्युचे प्रमाण देखील वाढले आहे़ या १२ दिवसात ४५२ रूग्ण आढळून आले असून ९ जणांचा मृत्यु झाला आहे़ आतापर्यंत बाधितांची संख्या २ हजाराच्यावर पोहचली असून मयताचा आकडा देखील ५४ पर्यंत पोहचला आहे़शहरासह तालुक्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या आढळून आल्यानंतर ग्रामस्थ स्वत:हून पुढे येत लॉकडाऊन घोषित करावे असे सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत़ उपलब्ध सुविधा शासनाच्या नियमावलीचे पालन केले तर कोरोना नक्की आटोक्यात येण्यास मदत होईल़कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या रोखण्यासाठी प्रशासनाला मदत करण्याची गरज आहे़ विविध शासकीय कार्यालयातील अधिकारीही कोरोनाबाधित होवू लागल्याने खबरदारी म्हणून काही दिवस संबंधित कार्यालय, विभागाचे कामकाज बंद ठेवावे लागत आहे़ त्यामुळे कर्मचाºयांवर कोरोनाचा ताण असतानाच कामाचाही ताण वाढतो आहे़ तालुका प्रशासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे़ त्यासाठी सर्व पातळीवरून सहकार्य मिळाले तर आपला तालुका कोरोनामुक्त होण्यास वेळ लागणार नाही़
नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 12:41 PM