धुळे : तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे पाणी टंचाईसोबत गुरांच्या चाऱ्याचीही टंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामसेवकांनी आतापासूनच आपापल्या गावाची स्थिती प्रशासनाला अवगत करावी. तसेच जिल्हा परिषद प्रशासनानेही पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना कराव्यात अशा सूचना खासदार डॅा. सुभाष भामरे यांनी जिल्हा परिषदेला दिल्या.
धुळे तालुक्यात जाणवणारी संभाव्य पाणी टंचाई व उपाययोजनांबाबत खासदार डॅा. सुभाष भामरे यांची मंगळवारी जिल्हा परिषदेच्या कै.यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक झाली. त्यावेळी अध्यक्षपदावरून ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता उपस्थित होते.
यावेळी तालुक्यातील प्रत्येक ग्रामसेवकाने आपल्या गावातील पाण्याची स्थिची सध्याची स्थिती अवगत केली. सध्या पावसाचे प्रमाण कमी असलेतरी पाणी टंचाई नाही. मात्र डिसेंबर-जानेवारीपासून पाणी टंचाई भासू शकते अशी शक्यता वर्तविण्यत आली. त्याचबरोबर गुरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो असे सांगण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वैरणची लागवड करावी अशी सूचनाही करण्यात आली.बैठकीत विज मंडळाबाबतही अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या.