धुळे - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली. त्यानंतर, भाजप नेत्यांकडून शिवसेनेवर सातत्याने टीका होत आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर काय वेळ आली, असे म्हणत शिवसेनेला लक्ष्य केलं जात आहे. आता, मंत्री गिरीश महाजन यांनीही धुळ्यात पत्रकारांशी संवाद साधताना या युतीवरुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. शिवसेनेची परिस्थिती वादळात भरकटलेल्या जहाजासारखी झाल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले.
उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली दिली, असे म्हणत गिरीश महाजन यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. यावेळी, पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देत मंत्री महोदयांनी सत्यजित तांबे यांच्या पाठिंब्याबद्दलही भूमिका स्पष्ट केली.
मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनी पक्षश्रेष्ठी जोपर्यंत हिरवा कंदील देणार नाहीत, तोपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नसल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे. नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकी संदर्भात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या पाठिंब्यासंदर्भात विचारणा झाली असता, आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत असून सध्या भाजपाकडून कुठल्याही उमेदवाराला उघडपणे पाठिंबा जाहीर करण्यात आला नसून, एबी फॉर्म देखील देण्यात आलेला नाही. याबाबत दोन दिवसात पक्षश्रेष्ठींसोबत बोलून निर्णय स्पष्ट होईल, अशी माहितीही गिरीश महाजन यांनी दिली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश मोठ्या वेगाने प्रगती करत असल्याचे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.