धुळे : शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे .शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याकडे जिल्हा समन्वय समितीचे दुर्लक्ष झाल्याने, जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीने समन्वय समितीतून बाहेर पडून स्वतंत्रपणे काम करण्याचा निर्णय घेत तसा ठराव केला. हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आल्याची माहिती समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी एका पत्रकान्वये दिली.जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक नुकतीच एन.डी.पाटील माध्यमिक विद्यालय, देवपूर धुळे येथे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात वरील ठराव करण्यात आला.जिल्ह्यातील शिक्षकांच्या २१ संघटना एकत्रित येत त्यांनी २०१४ मध्ये जिल्हा समन्वय समितीची स्थापना केली होती. शिक्षकांचे प्रश्न एकत्रितरित्या प्रशासनासमोर मांडून ते सोडण्यासाठी प्रयत्न करावेत हा समन्वय समिती स्थापनेचा मुख्य उद्देश होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, ते सोडविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच स्वतंत्रपणे काम करण्यासाठी प्राथमिक शिक्षक समितीने ‘समन्वय’मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीत पुढील तीन वर्षांसाठी जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र पाटील व सरचिटणीसपदी बापू पारधी यांच्या नावाचा ठराव मंजूर करण्यात आला.प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस बापू पारधी यांनी केले. यावेळी शिक्षक समितीच्या जिल्हा अधिवेशनाची तारीख निश्चित करण्यावरही चर्चा झाली. बैठकीला राज्य प्रतिनिधी कैलास दाभाडे, सुरेश पाटील, धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीचे व्हा.चेअरमन सुभाष पगारे, संचालक आनंद पाटील, अनिल नहिरे, जिल्हा कार्याध्यक्ष एकनाथ भामरे, जितेंद्र राजपूत, मनोज निकम, महेंद्र पाटील, रमेश पाटील, प्रमोद सोनवणे, अरूण खैरनार, रामचंद्र भलकारे, सुनील सोंजे, रमेश वाघ, ईश्वर वाघ, विजय भोई उपस्थित होते.
शिक्षक समिती ‘समन्वय’मधून बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 11:37 AM