कोरोना महामारीत जीव मुठीत घेऊन जगत असतानाच नेरसह परिसरात गेल्या आठवड्यात दोनदा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसमान्यांच्या जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यात कांदा काढणीनंतर जादा भाव मिळेल म्हणून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातच चाळीत कांदा साठवून ठेवला होता. उन्हाळा कडक असल्याने वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस येईल, अशी कोणतीही शक्यता शेतकऱ्यांना वाटली नव्हती. मात्र, या अस्मानी संकटाने रुद्र रूप धारण करीत शेतकऱ्यांच्या कांदा चाळी उद्ध्वस्त करीत लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. एवढेच नव्हे, तर अनेक नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. कोरोनामुळे सर्वांची आर्थिक परिस्थिती बेताची झाल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर आता घरांची डागडुजी किंवा भाड्याचे दुसरे घर घेऊन नागरिकांना संसार थाटावा लागणार आहे.
शासकीय यंत्रणा सुस्त
नेर हे नऊ सजा महसूल मिळून तयार झालेले गाव आहे. गावाची लोकसंख्या ३५ हजारांवर असल्याने दोन तलाठी असून, एका तलाठ्याला अतिरिक्त पदभार दिला असून, मंडळ अधिकाऱ्यांचेही कार्यालय नेर-म्हसदी फाट्यावर आहे; परंतु हे दोन्ही अधिकारी आपल्या मनाप्रमाणे कार्यालयात येतात. कार्यालयात आल्यावर दैनंदिन दाखले, उतारे देण्याचे काम करून परत निघून जातात. अनेकदा शेतकरी व नागरिक आपल्या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी या कार्यालयात चकरा मारतात; परंतु ते वेळेवर उपस्थित नसल्याने वाट पाहून आपल्या कामाला निघून जातात; पण एकही अधिकारी स्वतःहून गावातील घरांचे आणि शेतातील नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पुढे येत नाही. महसूल कर्मचाऱ्याच्या आदेशाने कोतवाल पंचनाम्यासाठी शेताच्या बांधावर जातो; परंतु महसूल तलाठ्याची भेट झाली तरी शासकीय कामे आहेत, धुळ्याला मीटिंग आहे, पंचानाम्याचे तेवढेच थोडे काम आहे, असे सांगून नागरिकांना निरुत्तर करतात. म्हणूनच नागरिक भरपाईपासून वंचितच राहत आहेत. बहुतांश सर्वच शेतकऱ्यांना आता शेतीची मशागत आणि अन्य कामांसाठी मजुरी देण्यासही पैसे राहिले नसल्याने अस्मानीबरोबरच सुलतानी संकटाने ते हताश झाले आहेत.
नुकसानभरपाईच्या ते प्रतीक्षेत आहेत. काही शेतकऱ्यांचे पंचनामे झाले; परंतु अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे शासकीय यंत्रणेकडून झालेले नाहीत.
लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष
दोन वेळा अवकाळी पावसाने नुकसान झाले तरी एकाही लोकप्रतिनिधीने पुढे येऊन पंचनामा करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयीही नाराजीचा सूर आहे.
सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब उन्मळून पडल्याने मंगळवारी वीजपुरवठा खंडित झाला होता. दिवसभर वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिकांचे उकाड्यामुळे प्रचंड हाल झाले.