धुळे: तहसीलदार, नायब तहसीलदार यांना वर्ग दोनचा दर्जा असताना वेतनश्रेणी वर्ग तीनची लागू आहे. हा अन्याय दूर करावा व ग्रेड पे ४८०० रूपये करण्यात यावे या मागणीसाठी जिल्ह्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहे. तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी क्युमाईन क्लबजवळ आंदोलन केले. तहसीलदार, नायब तहसीलदाराच्या संपामुळे महसूलचे काम ठप्प पडले आहे.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महसूल विभागातील नायब तहसिलदार राजपत्रित वर्ग-२ हे अत्यंत महत्वाचे पद आहे. परंतु नायब तहसीलदार या पदाचे वेतन राजपत्रित वर्ग-२चे नसल्यनाने महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना यांनी नायब तहसीलदार यांचे ग्रेड पे वाढविण्याबाबत १९९८ पासून शासनाकडे पाठपुरावा केला. मात्र मागणीचा कुठलाही विचार करण्यात आला नाही.
तहसीलदारांचे ग्रेड पे ४८०० रूपये करावे या मागणीसाठीधुळे जिल्ह्यातील अधिकारी धुळे शहरात क्युमाईन क्लबजवळ आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलनात निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, शिरपूरचे प्रांत अधिकारी प्रमोद भामरे, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर, तहसीलदार गायत्री सैंदाणे, तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेचे अध्यक्ष प्रथमेश घोलप, उपाध्यक्ष आशा गांगुर्डे, सचिव अविनाश सोनकांबळे, कोषाध्यक्ष पंकज पाटील, कार्याध्यक्ष शारदा बागले, संघटक ज्ञानेश्वर सपकाळे, नायब तहसीलदार संजय शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार आंदोलनात सहभागी झाले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"