सचिन देव, धुळे: आत्मनिर्भर भारत होण्याच्या दुष्टी कोनातुन देशातील प्रत्येक नागरिकाने लोकल वस्तु म्हणजे स्थानिक उत्पादने खरेदी करावी, यामुळे स्थानिक उद्योग-व्यावसायिकांना चालना मिळण्यासाठी भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे भुसावळ विभागातील दहा स्टेशनवर लवकरच स्थानिक वस्तु विक्रीचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. हे स्टॉल लावण्यासाठी विविध सामाजिक संस्था, उद्योग व बचतगटांना आवाहन करण्यात येणार आहे. यामध्ये बचतगटांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचे भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
आजकाल प्रत्येक व्यक्ती ब्रॅन्डेड वस्तु खरेदीलाच प्राधान्य देते. मात्र, स्थानिक स्तरावर तयार होणारे उत्पादन खरेदीकडे दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे स्थानिक व्यावसाय-उद्योग करणाऱ्यांचा विकास होत नाही आणि त्या पासून रोजगारही उपलब्ध होत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने हस्तकला उद्योग, पापड उद्योग, मसाला उद्योग, तसेच बचत गटांतर्फे तयार करण्यात येणाऱ्या वस्तुंना एक चांगली बाजारपेठ मिळण्याच्या दुष्टी कोनातुन रेल्वे स्टेशनवर अशा उद्योग-व्यावसायांना मोफत जागा देऊन स्टॉल उभे करून देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे कुठलेही शुल्क न आकारता रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रशासनातर्फेच हा स्टॉल उभा करून देण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक बचतगट किंवा उद्योजकांनी स्टेशन प्रबंधक यांच्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन भुसावळ विभागाचे सिनिअर डीसीएम डॉ. शिवराज मानसपुरे यांनी केले आहे.
या स्टेशनवर लागणार स्टॉल..
भुसावळ विभागातील मुर्तीजापुर, अकोला, नाशिक, नांदगांव, लासलगाव, खंडवा, बडनेरा, रावेर, अमरावती व बऱ्हानपुर या स्टेशनचा समावेश आहे. लवकरच स्टॉल उभारण्याबाबत प्रक्रियेला सुरूवात होणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. विशेष म्हणजे स्टेशनवर स्टॉलसाठी जागा व विजही मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.